‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावू नये! नाणार प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांच्या भूमिकेत बदल

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरून विरोधकांकडून पुन्हा एकदा राजकारण तापू लागले आहे. येथील स्थानिक नागरिकांना पाठिंबा देत रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रकल्पाला पाठिंबा देणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारं नाही,’ असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

वर्षभरापूर्वीच प्रकल्पाविरोधातील स्थानिक जनतेने राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी प्रकल्पाला विरोध करून स्थानिकांसोबत असल्याचे म्हटले होते. मात्र आज राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात प्रकल्पाच्या विरोधात काही स्थानिकांची असलेली भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसकट सर्व राजकीय पक्ष त्यांच्या पाठी उभे राहिले होते. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज एकही नवा उद्योग अथवा एकही परदेशी गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणं आपल्याला परवडण्यासारखं नाही. अन्यथा ‘औद्योगिकरणात अग्रेसर महाराष्ट्र’ ही राज्याची ओळख पुसायला वेळ लागणार नाही, असे म्हटले आहे.

221 गुजराती लोकांच्या भल्यासाठी भूमिका बदलली का? खासदार विनायक राऊत यांचा सवाल

नाणारमध्ये 221 भूमाफियांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांच्यासाठी राज ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे का, असा सवाल करीत हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी नाणारवासीयांसमोर भूमिका मांडावी, असे आव्हान शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे.

राज ठाकरे यांनी कोकणात येऊन नाणार प्रकल्प होऊ देणार नाही अशी घोषणा केली होती. आता त्यांचे मतपरिवर्तन कशासाठी झाले. हे माहीत नाही. 221 गुजराती लोकांनी जमिनी खरेदी केल्या त्यांच्या भल्यासाठी ही भूमिका घेतली आहे का, असा सवाल विनायक राऊत यांनी केला.

प्रकल्प महाराष्ट्रातच राहणार

रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातच राहणार आहे. राज्याच्या बाहेर जाणार नाही. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

रिफायनरी प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करा -आशीष देशमुख

रत्नागिरीच्या नाणार येथे प्रस्तावित रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाला शिवसेनेचा व स्थानिक लोकांचा विरोध आहे. हा प्रकल्प विदर्भात आल्यास उद्योगधंद्यांना एक नवी गती मिळेल तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळेल. विदर्भातील मागास जिह्यांमध्ये नवे उद्योगधंदे येण्यास व विदर्भाचा विकास होण्यास पूरक वातावरण निर्माण होईल तसेच कृषी आधारित प्रकल्पांना नव्या संधी उपलब्ध होऊन शेतकऱयांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल. तेव्हा हा प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करावा, अशी मागणी काँग्रेस नेते आशीष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

पानिपत, भटिंडा, दिल्ली, बिना, गोवाहाटी इत्यादी ठिकाणी इनलँड रिफायनरी प्रकल्प आहेत. या सर्व रिफायनरीज समुद्री बंदरांशी पाईपलाईनने जोडल्या आहेत. विदर्भातील रिफायनरीसुद्धा अशाप्रकारे मुंबई बंदराशी पाईपलाईनने जोडणे शक्य आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या