सन्मित्रनगर येथे घरफोडी, रोख रक्कमसह सोन्याचे दागिने केले लंपास

रत्नागिरी शहरातील सन्मित्र नगर येथील फ्लॅट फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 74 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला.ही घटना शनिवार 18 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वा. कालावधीत घडली आहे.

याबाबत रोशनी दिलीप फेपडे (38,रा.अमृतदर्शन सन्मित्र नगर, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवार सकाळी त्या काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. या संधीचा फायदा उठवत अज्ञाताने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप आणि कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर किचनमधील कपाटाचे ड्रॉव्हर आणि लॉकर उचकटून त्यातील रोख 13 हजार रुपये, सोन्याचा नेकलेस, साखळी, मंगळसूत्रातील पेंडल असा एकूण 73 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.