शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्यांची तोडफोड प्रकरणी उद्यान पर्यवेक्षक तात्पुरता निलंबीत

रत्नागिरी शहरात रविवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली. मारुतीमंदिर येथील शिवसृष्टीमधील मावळ्यांच्या पुतळ्यांची एका व्यक्तीने तोडफोड केली. या दुर्दैवी घटनेनंतर रत्नागिरीतील वातावरण तापले होते. नगरपरिषद प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत उद्यान पर्यवेक्षकाला तात्पुरते निलंबीत केले आहे. तसेच शिवसृष्टीमध्ये आता एक सुरक्षा रक्षकही नेमण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे.

रविवारी रात्री संदेश गावडे या 24 वर्षीय तरुणाने मद्याच्या धुंदीत शिवसृष्टीतील पुतळ्यांची तोडफोड केली. त्याने एकूण चार पुतळ्यांची तोडफोड केली. पोलीसांनी संदेश गावडे याला ताब्यात घेतले आहे. त्याची अधिक चौकशी सुरु आहे. या घटनेनंतर रत्नागिरी शहरातील वातावरण तापले होते. शिवसृष्टीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाने उद्यान पर्यवेक्षक नितीन यादव यांना तात्पुरते निलंबीत केले आहे. त्याचबरोबर भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरीता शिवसृष्टीमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्यात आला आहे.

अखेर नगरपरिषदेने लावले सीसीटीव्ही

रत्नागिरी शहरात जिल्हा नियोजनच्या निधीतून लावण्यात आलेल्या 57 सीसीटीव्हीपैकी किती सीसीटीव्ही सुरु आहेत हा संशोधनाचा विषय आहे. पोलीसांच्या सीसीटिव्हीवर अवलंबून न राहता आता नगरपरिषदेने आज स्वतःचे चार सीसीटिव्ही शिवसृष्टीमध्ये लावले आहेत. त्याचबरोबर तोडफोड झालेल्या पुतळ्यांच्या दुरुस्तीचे काम जे.जे.स्कूल ऑफ आर्टसने सुरु केले असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली.