रत्नागिरीत शॉर्टफिल्म फेस्टिव्हल

301

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या रत्नागिरी पर्यटन महोत्सवात स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या शॉर्टफिल्म्सचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २८ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता स्वा.वि.दा.सावरकर नाट्यगृहात रत्नागिरी शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये पाच शॉर्टफिल्म दाखवण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष राहूल पंडीत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

रत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या पूर्वसंध्येला हा शॉर्टफिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. या शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये समर्थ रंगभूमी रत्नागिरी निर्मित प्र.ल.हा लघुपट, रमेश कीर कला अकादमीचा रापण लघुपट, आशय सहस्त्रबुद्धे यांचा द अनअर्थड होलो, ओंकार रसाळ यांचा उडी आणि आदित्य सावंत यांचा पत्र हा लघुपट सादर होणार आहे.

ज्येष्ठ नाटककार कै. प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या नाट्यविषयक कारकिर्दीवर आधारीत प्र.ल. हा लघुपट आहे. या लघुपटाच्या डीव्हीडीचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच आकाशवाणी मुंबई केंद्राने या लघुपटाची दखल घेतली आहे. रापण हा लघुपट कोकणातील मच्छिमारांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा आहे. द अनअर्थड होलो हा लघुपट भगवती किल्ल्यावर असलेल्या भुयारावर आधारित आहे. हा साहसी लघुपट असून यामधून भुयाराची सफर घडते.

द अनअर्थड होलो हा लघुपट केरळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सादर करण्यात आला. उडी हा लघुपट लहान मुलांच्या मनातील भीतीवर भाष्य करणारा आहे. कोकणातील ग्रामीण जीवन या लघुपटातून पहायला मिळते. या लघुपटाने आतापर्यंत १७ अॅवॉर्ड पटकावले असून अनेक शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शन, संकलन, पटकथेचे पुरस्कार या लघुपटाला मिळाले आहेत. पत्र या लघुपटामध्ये पोस्टमनची प्रेमकथा चित्रित करण्यात आली आहे. या लघुपटाला मुंबई इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले असल्याची माहिती नगराध्यक्ष राहूल पंडीत यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश सावंत, समर्थ रंगभूमीचे श्रीकांत पाटील, पर्यटन महोत्सवाचे संयोजक अभिजीत गोडबोले उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या