रिफायनरी प्रकल्पाला जमीन देणार नाही, उपळे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सुनावले

37

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

रिफायनरी प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी जमीन देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही प्रकल्पासाठी जमीन देणार नाही अशी ठोस भूमिका उपळे येथील ग्रामस्थांनी जनसुनावणीच्या दरम्यान घेतली. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी विविध शंका आणि प्रश्न उपस्थित करत प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका मांडली.

राजापूरात नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलने आणि मोर्चाच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विरोध केला आहे. विविध निवेदने देऊन प्रकल्पाला असलेला विरोधही शासनापर्यंत पोहोचवला आहे. एका बाजूला ग्रामस्थांकडून प्रकल्पाला विरोध केला जात असताना दुसऱ्या बाजूला प्रासनाकडून प्रकल्पाची उभारणी करण्याच्या अनुषंगाने भूसंपादन प्रक्रिया राबवली जात आहे. या भूसंपादनाचा भाग म्हणून आज उपळे येथे जनसुनावणी झाली. यावेळी झालेल्या चर्चेच्या वेळी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी नेमकी जागा कोण संपादित करील आणि तिचा कशासाठी वापर करण्यात येणार आहे, यासंबधित माहिती दिली. यावेळी त्यांनी या भूसंपादन संबंधित ग्रामस्थांच्या हरकती आणि सूचना मांडण्याचे आवाहन केले. त्यावर चर्चा करताना रिफायनरी प्रकल्पाविरोधी शेतकरी मच्छिमार संघटनेचे सचिव भाई सामंत यांनी ग्रामस्थांची भूमिका मांडली.

यावेळी रिफायनरी प्रकल्पविरोधी शेतकरी – मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम, पं. स़. उपसभापती अश्विनी विणेर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या