
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील क्रांती महिला प्रभाग संघ, शिरगाव व आरंभ ग्रामसंघ, उन्नती ग्रामसंघ शिरगाव यांच्या नोंदवही व जमाखर्च रजिस्टरमध्ये खाडाखोड करून 11 लाख 19 हजार 906 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी मुग्धा शैलेश शेटये, संगीता रामदास मोरे (दोघेही रा. शिरगाव) यांच्या विरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपहाराची व्याप्ती मोठी असून पोलीस तपासात हे उघड होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे तालुका अभियान व्यवस्थापक निलेश ढमाले यांनी शहर पोलिस स्थानकात या प्रकरण तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार 18 जुलै 2018 ते 2 जून 2023 या कालावधीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रजिस्टर असलेल्या क्रांती महिला प्रभाग संघ, शिरगाव व आरंभ ग्राम संघ, उन्नती ग्रामसंघ शिरगाव यांचे मासिक बैठक अहवाल नोंदवही व जमाखर्च नोंदवही यामध्ये खाडाखोड करुन उपरी लेखन व व्हाईट शाईचा वापर केल्याचे तपासणीमध्ये दिसून आले आहे.
प्रकरणाची अंतिम चौकशी जिल्हा अभियान सहसंचालक, जिल्हा अभियान व्यवस्थापक आणि सहाय्यक लेखाधिकारी यांनी केलेली असून त्या चौकशी अहवालावरुन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या अपहार प्रकरणी क्रांती प्रभागसंघ शिरगावचे तत्कालीन व सद्यस्थितीतील सर्व पदाधिकारी, प्रभाग संघ लेखापाल तसेच कार्यरत प्रभागसंघ व्यवस्थापक मुग्धा शेट्ये, व तत्कालीन प्रभाग संघ अध्यक्ष संगिता मोरे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपासणी अहवालाचे अवलोकन करुन अपहार प्रकरणी क्रांती प्रभागसंघ शिरगावचे तत्कालीन व सद्यस्थितीतील सर्व पदाधिकारी, प्रभाग संघ लेखापाल तसेच कार्यरत प्रभागसंघ व्यवस्थापक मुग्धा शेट्ये, व तत्कालीन प्रभाग संघ अध्यक्षसंगिता मोरे यांनी क्रांती प्रभाग संघ, आरंभ ग्रामसंघ, उन्नती ग्राम संघ शिरगाव ता.जि.रत्नागिरी यांनी बैठक अहवाल नोंदवही व जमाखर्च नोंदवही यामध्ये खाडाखोड करुन उपरी लेखन व व्हाईट शाईचा वापर करुन तसेच 11 लाख 19 हजार 906 रुपये अपहार केलेला आहे. निलेश ढमाले यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी मुग्धा शेट्ये, संगिता मोरे यांच्या विरोधात भादंविक 420, 467, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक शीतल पाटील करत आहेत.