झणझणीत

शेफ मिलिंद सोवनी

मस्त तिखट… डोळ्यांतून आणि नाकातून पाणी आणणारे चमचमीत पदार्थ खावेत तर थंडीतच…

थंडीमध्ये तिखट आणि चमचमीत पदार्थ खायची इच्छा होते. त्यामुळे या आठवडय़ात तसेच पदार्थ घेतले आहेत. तिखट व चमचमीत म्हटलं म्हणजे डोळ्यांसमोर झणझणीत मिसळ येते किंवा एखाद्या नॉनव्हेजचा रस्सा. मुद्दाम ते न देता येथे मी जरा वेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज घेतल्या आहेत. पहिली रेसिपी आहे रावण पिठलं आणि दुसरी आहे पत्थर कबाब. देशस्थी पद्धतीचा हा पदार्थ. हे खूपच झणझणीत असतं. झुणक्यासारखं असूनही जबरदस्त तिखट असतं. थंडीत हे रावण पिठलं ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूप मजा येते.

दुसरा प्रकार पत्थर कबाब. गरम म्हटलं की तव्यावरचे पदार्थ लोकांना आवडतात. तव्यावरचे पदार्थ म्हणजे तवा भाजी, तवा पुलाव किंवा पावभाजी. हे पदार्थ ऍक्चुअली तव्यावर बनत नाहीत. ती तव्यावर टाकून सर्व्ह केली जाते इतकंच. म्हणून मी असा पदार्थ निवडलाय जो ऍक्चुअली शिजतोही तव्यावर आणि तो वाढायचाही तव्यावरच.

रावण पिठले

साहित्य : एक कप बेसनाचे पीठ, एक कप लाल तिखट, एक कप तेल, एक कप सुके खोबरे किसलेले, पाव कप कोथिंबीर. (फोडणीसाठी) मोहरी एक चमचा, हिंग पाव चमचा, हळद पाऊण चमचा.

कृती : सर्वप्रथम बेसनाचे पीठ, लाल तिखट, तेल, सुके खोबरे आणि पाणी यांचे मिश्रण करून घ्यायचे. नंतर तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून तडतडले की वरील मिश्रण त्यात टाकायचे. शेवटी कापलेली कोथिंबीर त्यात मिसळायची. सर्व्ह करतानाही कोथिंबीर त्यावर भुरभरवायची. ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर हे पिठले अप्रतिम लागते.

पत्थर कबाब

साहित्य : बोनलेस मटणाचे तुकडे २५० ग्रॅम, आले-लसणाची पेस्ट वीस ग्रॅम, दही शंभर ग्रॅम, लाल तिखट दहा ग्रॅम, मीठ चवीनुसार, गरम मसाला पावडर पाच ग्रॅम, तेल पंधरा मि.ली., कच्चा पपई ५० ग्रॅम.

कृती : प्रथम बोनलेस मटणाचे तुकडे घेऊन ते बारीक करून घ्यायचे. त्यांना मग आले-लसणाची पेस्ट, मीठ आणि पपई लावून किमान दीड ते दोन तास बाजूला ठेवायचे. त्यानंतर एका वाटीत जाडसर दही घेऊन त्यात मीठ, लाल तिखट आणि गरम मसाला टाकायचे. हे मिश्रण बाजूला ठेवलेल्या मटणाच्या तुकडय़ांमध्ये घालायचे. आता हे मिश्रणही आणखी तीनेक तास बाजूला ठेवून द्यायचे. त्यानंतर जाड बुडाच्या तव्यावर थोडे तेल घालून मटणाचे तुकडे शिजू द्यायचे. या पत्थर कबाबवर थोडी कोथिंबीर, कांद्याचे काप आणि थोडा लिंबाचा रस टाकून सर्व्ह करायचे.

आपली प्रतिक्रिया द्या