रक्षा खडसे यांचा भाजपच्या संकेतस्थळावर आक्षेपार्ह उल्लेख, अनवधानाने घडलेली चूक का कारस्थान?

भाजप खासदारांची नावे, मतदारसंघ आणि फोटो यांची यादी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारसंघाचे नाव, मराठी भाषेबद्दलच्या अज्ञानातून आणि गुगलच्या मदतीने भाषांतर करण्याच्या नादातून रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह शब्दाचा उल्लेख करण्यात आला होता. पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ही धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे. चतुर्वेदी यांनी एका ट्विटद्वारे हा प्रकार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या लक्षात आणून दिला आहे.

जळगांव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघाच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांच्याबद्दल हा आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आकस बुद्धीतून हा सगळा प्रकार घडला आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आलं नसलं तरी असं सांगितलं जात आहे की गुगल ट्रान्सलेटरची मदत घेतल्याने हा सगळा घोळ झालेला आहे. पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी याच गोष्टीवर बोट ठेवत त्यांच्या ट्विटमध्ये प्रश्न विचारला आहे की ‘तुमच्या पक्षाच्या खासदाराबद्दल अवमान करणारे उल्लेख असणारी भाजपची अधिकृत वेबसाइट कोण चालवतं?’

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांनीही एक ट्विट केलं आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की ‘भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसेजी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र पोलिसांचा सायबर विभाग पुढील कारवाई करेल.’

या प्रकारावरून बराच गदारोळ झाल्यानंतर भाजपने त्यांची चूक सुधारली असून रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाऐवजी दिसणारा आक्षेपार्ह शब्द दुरुस्त करण्यात आल्याचं कळतं आहे.

raksha-khadse-updated-bjp-website

आपली प्रतिक्रिया द्या