‘धनुष्यबाण’ पेलण्याची ताकद शिवसेनेच्या मनगटात

112

वाघोड येथे शिवसेना व युवा सेना शाखेचे उद्घाटन

रावेर – शिवसेना ही अन्य राजकीय पक्षापेक्षा वेगळी आहे. शिवसेनेत जातपात विचारली जात नाही. जनहिताची कामे करणार्‍यांना शिवसेनेत वाव व संधी आहे. ग्रामीण भागातही शिवसेनेची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. इतकेच नव्हे तर ‘धनुष्याबाण’ पेलण्याची ताकद शिवसेनेत आहे. तेव्हा जुन्या जाणत्या शिवसैनिकांचे मार्गदर्शन घेत गावासह त्यांचे प्रश्‍न समजावून घेऊन त्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा, असे आवाहन उपनेते शरद पोंक्षे यांनी केले.

तालुक्यातील वाघोड येथे शिवसेना व युवासेना शाखा उद्घाटनप्रसंगी आयोजित जाहीर सभेत पोंक्षे बोलत होते. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना सहसंपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हाउपप्रमुख प्रल्हाद महाजन, मनोहर पाटील, तालुकाप्रमुख योगीराज पाटील, भुसावळ तालुका प्रमुख समाधान महाजन, युवासेना जिल्हा युवाधिकारी अविनाश पाटील, जि.प.माजी अध्यक्ष उखर्डू तडवी, रवींद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा वाघोड शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. सुरुवातीस उपनेते पौंक्षे व मान्यवरांच्या हस्ते वाघोड येथील शिवसेना व युवासेना शाखांच्या फलकांचे अनावरण झाले. याप्रसंगी वाघोड तसेच अन्य गावांमधील विविध पक्षांचे पदधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व युवकांनी शिवसेनेत व युवा सेनेत प्रवेश केला. या सर्वांचे उपनेते शरद पोंक्षे व मान्यवरांनी भगवे उपरणे देऊन स्वागत केले.

यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेना रावेर शहरप्रमुख नितीन महाजन, युवासेना तालुका युवाधिकारी प्रवीण पंडित, शहर युवाधिकारी राकेश घोरपडे, पी.एल. महाजन, वाय.व्ही. पाटील, सुनील महाजन, संतोष महाजन, अतुल पाटील, सचिन महाजन, कडू महाजन, कैलास पाटील, कमलेश पाटील, रामकृष्ण पाटील, तुळशिराम महाजन, रवींद्र पाटील, जगदिश महाजन, राजेंद्र मोपारी, जगदीश पाटील तसेच शिवसेना, युवासेना पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवासैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले.

तालुक्यात शिवसेनेचा झंझावात
तालुक्यातील खिर्डी, निंभोरा, मोरगाव (खु.), मोरगाव (बु.), अटवाडे या गावांमध्येही ढोल-ताशांच्या गजर, फटाक्यांची आतषबाजीत शिवसेना व युवासेना शाखांचे उद्घाटन उपनेते शरद पोंक्षे, सहसंपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व मान्यवरांच्या हस्ते झाले. ’कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’ ’जय भवानी, जय शिवराय’, ’शिवसेना झिंदाबाद’ आदी बुलंद घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

जे ओठात तेच पोटात
शिवसेनेने कोठेही गनिमी कावा केला नाही. ’ओठात एक आणि पोटात दुसरेच’ असे दळभद्री राजकारण शिवसेनेने कधीच केले नाही, अशी चौफेर टोलेबाजी करत उपनेते पोंक्षे यांनी खरपूस समाचार आपल्या भाषणातून घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या