रवी भागचंदका यांचा ‘चॅम्पियन्स’ लवकरच येतोय, स्पॅनिश चित्रपटाचे अधिकार घेतले; स्क्रिप्टचे काम पूर्ण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकीर्दीवर आधारित ‘सचिन-अ बिलियन ड्रीम्स’ यासारखी दर्जेदार कलाकृती निर्माण करणारे निर्माते रवी भागचंदका यांनी ‘200 नॉटआऊट’ या आपल्या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘चॅम्पियन्स’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. आमीर खान प्रॉडक्शन आणि सोनी पिक्चर्स यांच्या बरोबरीने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. हा एका स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक असेल.

1902 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ब्रूस्टर्स मिलियन्स’ या जॉर्ज मैककचिओन्स यांच्या पुस्तकावर चित्रपट निर्मिती करण्याचे अधिकारदेखील रवी यांच्याकडे आहेत. या चित्रपटाबाबत रवी भागचंदका म्हणाले, ‘‘या चित्रपटाच्या क्रिप्टवर काम पूर्ण झाले असून आम्ही लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करू. या रिमेकमध्ये आमीर खान अभिनय करणार होते, पण त्यांनी काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यामुळे आता ते या चित्रपटाची सहनिर्मिती करत आहेत. चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण असणार हे लवकरच आम्ही जाहीर करू.’’ याशिवाय आगामी काळात अश्विन संघी यांच्या पुस्तकांवर आधारित एक राजकीय थरारनाटय़ असणारी वेब सीरिज, अर्जेंटियन बेस्ट सेलर ठरलेली कादंबरी ‘ऑल यूवर्स’ यावर आधारित चित्रपट तसेच एका स्पोर्टस् बायोपिकचीदेखील आम्ही निर्मिती करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.