मतदारांना प्रलोभन दाखवल्याप्रकरणी आमदार रवि राणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

3009

अमरावती येथील बडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवि राणा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेली घोषणाबाजी त्यांना भोवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निवडणूक निरीक्षक अधिकार्‍यांनी केलेल्या पाहणीत हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यामुळे राणा यांच्या विरोधात मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी भातकुली पोलिसांना दिले आहेत.

या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्यावतीने बडनेरा मतदान संघाच्या निवडणूक अधिकारी डॉ. स्नेहल कनिगे यांनी भातकुली ठाण्यात तशी तक्रार यापूर्वीच नोंदविली असून त्याबाबत भातकुली पोलिसांनी तसे गुन्हेही दाखल केले आहेत. त्यामुळे रवि राणा यांच्या निवडणुकीत झालेल्या विजयावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रवि राणा यांनी बडनेरा मतदार संघाची निवडणूक लढवताना अवलंबलेली पद्धत भ्रष्ट स्वरुपाची होती. त्याची नोंद केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. आमदार रवि राणा यांच्या प्रचारावेळी ‘आई दिवाली, भरलो किराणा, चुन के लाओ रवि राणा’ अशी घोषणाबाजी करण्यात आली होती. तसेच, राणा यांनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचंही निष्पन्न झालं आहे.

रवि राणा यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यांनी निर्धारित 28 लाखांपेक्षा जास्त खर्च केल्याचे चौकशीत आढळून आल्यामुळे राणा चौकशीच्या फेरीत अडकले आहे. कार्यालयांतर्गत दैनंदिन छायांकित रजिस्टरमध्ये केलेल्या खर्चाची नोंद व आमदार राणा यांनी सादर केलेल्या दैनंदिन खर्चाच्या नोंदीमध्ये 40 लाख 45 हजार 897 रुपयांची तफावत आढळून आली आहे. ही बाब निवडणूक आयोगाकडे निवडणूक निरीक्षक रामकृष्ण बंडी यांनी 20 नोव्हेंबर रोजी निर्दशनास आणून दिली. यावेळी राणा यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून निवडणुकीत भ्रष्ट प्रकाराचा अवलंब करून निवडणूक लढविल्या प्रकरणी रवि राणांविरुद्ध तक्रार नोंदविली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी बडनेरा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहल कनिजे यांना दिलेल्या पत्रात आ. राणा यांच्याकडून किराणा वाटपाबाबत वाटलेल्या आणि भातकुली पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेल्या 3310 कूपनांची नोंद शाडो रजिस्टरमध्ये घेऊन निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली. अधिनियम 1951च्या कलम 123 वर 127 नुसार फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रचारासाठी रवि राणा यांनी संदेश पाठवून 10 वर्षांपर्यंत मोफत किराणा देतांनाच तसे कार्ड मतादारांना वितरीत केल्याचे आढळून आले आहे. मतदारांना प्रलोभन देणे हा प्रकार लाचखोरीच्या व्याख्येत येत असल्याने अशाप्रकारच्या विशिष्ट गुन्ह्याची नोंद करण्यात यावी असेही आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. झालेल्या तक्ररीनंतर राजकीय दबाव वाढल्यामुळे तक्रारीचे पुढे काय झाले, याची माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या