काँग्रेसने गांधी परिवारातच ‘भारतरत्न’ वाटले, रविशंकर प्रसाद यांचा नागपुरात हल्लाबोल

2191

‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘भारतरत्न’ या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान करण्याची मागणी होत असेल तर काँग्रेसच्या पोटात खुपायाचे कारण काय? काँग्रेसच्या राजवटीत तर गांधी परिवारातच भारतरत्न वाटले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल या महापुरुषांचा भारतरत्न ने सन्मान करण्यासाठी इतकी वर्षे का लागली?’, असा सवाल केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

महाराष्ट्र भाजपच्या निवडणूक संकल्पपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारतरत्नने सन्मानीत करण्याची शिफारस करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यावर काँग्रेसकडून आलेल्या प्रतिक्रियेवर बोलताना रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर तोफ डागली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशभक्तच होते. अंदमानमधील कोठडीत सावरकरांनी तारुण्याची 11 वर्षे हालअपेष्टा सहन करत काढली आहेत. स्वातंत्र्यानंतर सावरकरांनी देशाकडून कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. अशा महापुरुषाला भारतरत्न मिळणार असेल तर त्याचे स्वागतच झाले पाहिजे. काँग्रेसच्या राजवटीत गांधी कुटुंबातच भारतरत्न दिले गेलेत. आमचा त्याला विरोध नाही. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 1990 मध्ये व्ही.पी. सिंग यांच्या कार्यकाळात तर सरदार पटेलांना 1991 मध्ये तर मौलाना आझादांना 1992 मध्ये नरसिंहराव सरकारने भारतरत्न दिले. या महापुरुषांना भारतरत्न देण्यास इतकी वर्ष का लागली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सावरकरांना ‘भारतरत्न’ देऊ नका; भाजपच्या संकल्पाला काँग्रेस, ओवैसींचा विरोध

राष्ट्रपिता महात्मा गांधींचे व्यक्तिमत्व भारतरत्न पेक्षा कितीतरी मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची यासाठी शिफारस झाली नसावी. खरे तर गांधीजी त्याचवेळी नोबेल पुरस्काराचे सर्वात मोठे दावेदार होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 370 कलम हटविल्याचा विरोध करणाऱ्या काँग्रेसने या कलमातील कोणत्या गोष्टी चांगल्या होत्या, हे आधी स्पष्ट करावे, असे आवाहन रविशंकर प्रसाद यांनी दिले.

सध्या प्रचारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काश्मीरमधील रद्द केलेल्या कलम 370 चा मुद्दा उपस्थित करत आहेत. भाजपा कलम 370 चा मुद्दा महाराष्ट्राच्या प्रचारात का उपस्थित करत आहेत असा प्रश्न विरोधक करत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, हा राष्ट्रीय मुद्दा आहे. कलम 370 रद्द केल्याने तब्बल 70 वर्षांनी जम्मू-कश्मीरात शांतता दिसून येत आहेत. तेथील जनता आनंदात आहेत. पहिल्यांदाच 35 हजार सैनिकांची भरती होत असून, त्यासाठी काश्मीरमधील युवक उत्साही आहे. विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहे. 70 वर्षात काश्मीरला कलम 370 चा कुठला फायदा झाला ते सांगावे आणि नंतर त्याबाबत प्रश्न उपस्थित करावे असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या