आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवायचाय! प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा निर्धार

171

कपिलदेव यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने शुक्रवारी रवी शास्त्री यांची हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली. पुन्हा एकदा या पदावर नियुक्त झाल्यानंतर रवी शास्त्री म्हणाले, हिंदुस्थानच्या संघातील खेळाडूंच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. त्यामुळेच मुख्य प्रशिक्षकपदासाठी मी इच्छुक होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील महान संघांचा वारसा आम्हाला पुढे चालवायचाय. इतर संघ अनुकरण करू शकतील असा खेळ आम्हाला करायचाय. क्रिकेटविश्वात ठसा उमटवायचाय, असा विश्वास पुढे त्यांनी व्यक्त केला.

रवी शास्त्री यांच्यासमोर खडतर आव्हान आहे. हिंदुस्थानला पुढील दोन वर्षांमध्ये दोन ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप (ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थान) आणि न्यूझीलंड, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये मालिका खेळावयाची आहे. यावर रवी शास्त्री म्हणाले की, टीम इंडियाच्या वन डे व ट्वेंटी-20 संघात आगामी काळात युवा खेळाडूंचा भरणा असेल. कसोटीतही थोडय़ा प्रमाणात नवे चेहरे दिसतील. चार ते पाच गोलंदाज तयार व्हायला हवेत. दोन वर्षांत माझ्यासह संघव्यवस्थापनाचे हेच ध्येय असणार आहे. माझा करार संपेल तेव्हा टीम इंडिया भक्कम स्थितीत असेल, अशी इच्छा पुढे त्यांनी व्यक्त केली.

संघ निवड करताना आमचे मत विचारात घ्यावे!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाखतीदरम्यान सल्लागार समितीने रवी शास्त्री यांना विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात हिंदुस्थानी फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना रवी शास्त्री यांनी संघ निवडीदरम्यान आपले मत विचारात घ्यावे अशी मागणी केली आहे. कित्येक वेळा संघनिवडीदरम्यान कर्णधार विराट निवड समितीसोबत आत आणि मी बाहेर बसल्याचेही शास्त्री यांनी सल्लागार समितीला सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या