जाडेजा, विहारीचे हिंदुस्थानी संघात कमबॅक; जागतिक कसोटी चॅम्पियनशिप व इंग्लंड दौरा

हिंदुस्थानच्या सीनियर क्रिकेट निवड समितीने शुक्रवारी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंड दौऱयातील पाच कसोटी सामन्यांसाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघाची घोषणा केली. रवींद्र जाडेजा हनुमा विहारी या दोघांचे टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमन झाले असून हार्दिक पांडय़ा कुलदीप यादव या दोघांनाही या संघात स्थान देण्यात आलेले नाही. 18 जून रोजी हिंदुस्थानन्यूझीलंड यांच्यामधील फायनल लढतीला सुरुवात होणार असून त्यानंतर इंग्लंडमध्येच हिंदुस्थानइंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटींचा थरार पाहायला मिळणार आहे.

24 खेळाडूंची निवड

जगभरात सध्या कोरोनाची लाट सुरू आहे. त्यामुळे हिंदुस्थानकडून आगामी प्रदीर्घ दौऱयात 24 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 20 खेळाडूंना अंतिम चमूत स्थान देण्यात आले असून चार खेळाडू स्टॅण्डबाय म्हणून ठेवण्यात आले आहेत. यामध्ये अभिमन्यू इस्वरन, प्रसिध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवासवाला या खेळाडूंचा समावेश आहे.

सहा वेगवान गोलंदाज

इंग्लंडमधील वातावरण व खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक ठरतात. या दौऱयात टीम इंडियाकडे सहा वेगवान गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, उमेश यादव व शार्दूल ठाकूर यांच्या खांद्यावर टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे.

दोन डावखुरे अन् दोन ऑफस्पिनर

हिंदुस्थानच्या या संघात चार फिरकी गोलंदाजांना स्थान देण्यात आले आहे. रविचंद्रन अश्विन व वॉशिंग्टन सुंदर या ऑफस्पिनर्ससह रवींद्र जाडेजा व अक्षर पटेल या डावखुऱया फिरकी गोलंदाजांना अंतिम 20 जणांच्या चमूत संधी देण्यात आली आहे. मागील काही कसोटींमध्ये अधिक काळ बेंचवरच बसलेल्या कुलदीप यादवला बाहेर बसवण्यात आले आहे.

तीन सलामीवीर

आगामी दौऱयात हिंदुस्थानी संघात तीन सलामीवीरांची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल व मयांक अग्रवाल यांच्यापैकी दोघांना सलामीवीराची भूमिका बजावी लागणार आहे. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारी यांना मधल्या फळीत धावा कराव्या लागणार आहेत. ऑस्ट्रेलियन दौऱयात दुखापतीला सामोरा गेलेला हनुमा विहारी पूर्णपणे फिट झाला असून त्याचे संघात कमबॅक झाले आहे.

राहुल, साहाची एण्ट्री फिटनेसवर अवलंबून

लोकेश राहुल शस्त्रक्रियेमुळे  आयपीएलचे  सामने मुकला होता. तसेच रिद्धीमान साहालाही आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे या दोघांनाही या दौऱयात निवडण्यात आले असले तरी फिटनेस बघितल्यानंतरच  त्यांना अंतिम संघात स्थान देण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा रिषभ पंत यष्टिरक्षणाची भूमिका बजावेल.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना

  • हिंदुस्थान-न्यूझीलंड      –             18 ते 22 जून, साऊथम्पटन

हिंदुस्थानइंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली कसोटी       –             4 ते 8 ऑगस्ट, नॉटिंगहॅम
  • दुसरी कसोटी –                    12 ते 16 ऑगस्ट, लॉर्डस् (लंडन)
  • तिसरी कसोटी –                   25 ते 29 ऑगस्ट, लीडस्
  • चौथी कसोटी –                     2 ते 6 सप्टेंबर, ओव्हल (लंडन)
  • पाचवी कसोटी –                     10 ते 14 सप्टेंबर, मँचेस्टर
आपली प्रतिक्रिया द्या