जाडेजाने झुंजार खेळ करत मला चुकीचे ठरवले, मांजरेकरांनी मागितली माफी

86

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधून टीम इंडिया बाहेर झाली. बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध हिंदुस्थानचा पराभव झाला. या लढतीत रवींद्र जाडेजाने एकाकी झुंज दिली. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी असा ‘थ्री डी’ खेळ करत जाडेजाने टीकाकार संजय मांजरेकर यांची बोलती बंद केली आहे. जाडेजाच्या खेळावर टीका करणाऱ्या मांजरेकर यांनी त्याचा सेमी फायनलमधील खेळ पाहून माफी मागितली आहे.

आयसीसीने या संदर्भात एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. समालोचक इयान स्मिथ आणि नियाल ओब्रायन यांच्याशी बोलताना मांजरेकर म्हणतात, जाडेजाने आपल्या अफलातून खेळाने मला चुकीचे ठरवले. हा जाडेजा आम्ही यापूर्वी कधी पाहिला नाही. तसेच ते पुढे म्हणाले की, मला त्याची माफी मागावी लागेल. तो मला शोधत आलाही होता, परंतु मी जेवणासाठी गेलेलो होतो. मी आता त्याची माफी मागतो.

याआधी मांजरेकर यांनी जाडेजाच्या खेळावर टीका केली होती. यानंतर जाडेजाने देखील त्यांनी ‘शाब्दिक हगवण’ बंद करण्याचा सल्ला दिला होता. आता सेमी फायनलमध्ये 1 रनआऊट, 2 झेल, 1 बळी आणि 77 धावा काढत जाडेजाने आपला अप्रतिम खेळ दाखवून दिला आणि मांजरेकर यांना खोटे ठरवले.

आपली प्रतिक्रिया द्या