बॅड लक… जायबंदी जडेजा इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर

team-india-jadeja

टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा इंग्लंड विरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नसल्याचे वृत्त आहे. सिडनीमध्ये तिसऱ्या कसोटीमध्ये डावा हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्याला बरे होण्यासाठी सहा आठवड्यांचा वेळ लागणार आहे. इंग्लंड विरुद्धची मालिका 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध चार कसोटी, पाच टी-20 (आंतरराष्ट्रीय) आणि तीन एकदिवसीय सामन खेळवण्यात येणार आहेत. पहिले दोन कसोटी सामने चेन्नई मध्ये खेळवण्यात येतील. तर पुढले दोन अहमदाबाद येथे खेळवले जातील. BCCI च्या सूत्रांनी सांगितले की, T20I आणि ODI मध्ये जडेजाचा समावेश होणार की नाही याचा फैसला नंतर घेतला जाईल.

32 वर्षाच्या रवींद्र जडेजाचे नाव इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी घेण्यात आले नव्हते. मात्र आता शेवटच्या दोन कसोटी सामन्यासाठीही संघात त्यांच्या नावाचा समावेश केला जाणार नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीत देखील तो संघाच्या बाहेर होते.

जडेजा बेंगळुरू मध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये रिहॅब च्या प्रकियेतून जाईल. अधिकारी म्हणाले, ‘तो कसोटी मालिकेतून बाहेर गेला असून त्याला बरे होण्यासाठी सहा आठवड्याहून अधिक काळ जावा लागेल. त्यामुळे पुढल्या मालिकांसाठी त्याचा संघात समावेश करण्याच्या निर्णय नंतर घेतला जाईल.’

असा आहे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), आर. अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मो. सिराज, शार्दुल ठाकुर.

हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे

पहिली कसोटी: 5 ते 9 फेब्रुवारी: चेन्नई

दुसरी कसोटी: 13 ते 17 फेब्रुवारी: चेन्नई

तिसरी कसोटी: 24 ते 28 फेब्रुवारी: अहमदाबाद (मोटेरा येथे डे-नाइट)

चौथी कसोटी: 4 ते 8 मार्च: अहमदाबाद

आपली प्रतिक्रिया द्या