भोडसीच्या रवींद्रनी बायकोला कॉलगर्ल म्हणत फेक प्रोफाईलवरून शेअर केले अश्लील व्हिडीओ

हरयाणातील भोडसी इथे राहणाऱ्या रवींद्र राघव नावाच्या आरोपीला उत्तर प्रदेशातील नोएडामधल्या इकोटेक-3 पोलिसांनी अटक केली आहे. बायकोचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. नोएडा पोलिसांच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती देताना सांगितले की रवींद्रचं सुष्मिताशी (बदलेलं नाव) लग्न झालं होतं. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये वाद झाल्याने सुष्मिता घर सोडून निघून गेली होती. सुष्मिताने ग्रेटर नोएडा भागात राहायला सुरुवात केली होती आणि एका खासगी कंपनीत ती कामालाही लागली होती.

बायको घर सोडून गेल्याने रवींद्र संतापला होता. तिने नोकरी करायला सुरुवात केल्याचं कळाल्यानंतर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्याने बायकोला धडा शिकवण्याचं ठरवलं होतं, ज्यासाठी त्याने पवन धनखड नावाने एक फेसबुक प्रोफाईल तयार केलं. या प्रोफाईलवर त्याने सुष्मिताचे अश्लील व्हिडीओ अपलोड केले. रवींद्र इतक्यावरच थांबला नाही, त्याने आपल्याच बायकोला कॉलगर्ल म्हणत तिचा फोननंबरही व्हायरल केला. ही पोस्ट पाहिल्यानंतर वासनांध लोकांनी सुष्मिताला फोन करायला सुरुवात केली.

अचानक यायला लागलेल्या या फोनमुळे काहीतरी गडबड असल्याचं सुष्मिताला कळालं होतं. लोकांनी तिला कॉलगर्ल समजून अश्लील संभाषण करायला सुरुवात केली होती. यामुळे घाबरलेल्या सुष्मिताने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. चौकशीमध्ये पोलिसांना कळालं की या सगळ्यामागे रवींद्रचाच हात आहे. त्यांनी रवींद्रला अटक करत त्याचा मोबाईल जप्त केला आहे. पोलिसांनी रवींद्रचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या