साहित्यजगत – असेही शेवटचे निरोप

>> रविप्रकाश कुलकर्णी

ना. धों. महानोर गेले (जन्म – 16 सप्टेंबर 1942, मृत्यू-3 ऑगस्ट 2023). शेतीत रमलेल्या महानोर यांची कविता प्रकटली ती ‘हिरव्या बोलीचा शब्द’ होऊन. रानात प्राण गुंतलेल्या या कवीच्या सुरुवातीच्या कविता ‘रानातल्या कविता’ संग्रहातून आल्या तेव्हा ठसला तो त्यांचा रंग, गंध, स्पर्श आणि संवेदना… या सगळ्या जाणिवांना लगटून आलेला रानगंध. त्यामुळे त्यांना अखेरचा निरोप त्यांच्या गावच्या मातीत म्हणजे पळसखेडला दिला गेला.

हे रीतीला धरून झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून महानोर यांचे चाहते आपल्या आवडत्या कवीला मानवंदना देण्यासाठी आलेले होते. या वेळी एक आगळीवेगळी घटना घडली. अंत्यसंस्काराच्या वेळी सुदीपा सरकार यांनी उत्स्फूर्तपणे महानोर यांची कविता म्हटली…

‘पीक करपलं, पक्षी दूरदेशी गेलं

गाळणाऱया झाडांसाठी मन ओथंबलं’

हे वाचताना माझ्या मनात महानोर यांच्याच ओळी आल्या.

‘गुंतलेले प्राण या रानात माझे,

फाटकी ही झोपडी काळीज माझे,

मी असा आनंदुनी  बेहोश होता,

शब्दगंधे तू मला बाहूंत घ्यावे’

हे लिहीत असताना एकदम आठवली ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर याची अंत्ययात्रा. 16 जानेवारी 2007 ला ओपीचा 81 वा वाढदिवस दणक्यात राणी नाखवाच्या घरी झाला. त्यानंतर ओपी ईडन वुड्सला हवेशीर घरात राहायला गेला. पुढचा वाढदिवस इथे आणखी दणक्यात करायचा ठरलं, पण ती वेळ आलीच नाही. 28 जानेवारी 2007चा रविवार, ‘ओपी गेला…’ ही बातमी वाऱयासारखी पसरली. ओपीच्या पार्थिव शरीराच्या बाजूला त्याची ती सुप्रसिद्ध फेल्ट हॅट, चांदीची मूठ असलेली काठी, पायाशी पांढरे बूट आणि  बाजूला त्याची आवडती अत्तराची शिशी.

अंत्ययात्रा ठाण्याच्या स्मशानात पोहोचली. आपल्या रक्ताच्या कुणाही नातेवाईकाला बोलवायचं नाही हे आधीच ओपीने सांगितलं असल्यामुळे कुणाची वाट पाहणं नव्हतं. मात्र चाहत्यांची भरपूर गर्दी झालेली होती. चिता रचली गेली. मंत्राग्नी  द्यायचा की भडाग्नी हा प्रश्नच नव्हता. अॅडव्होकेट शैलेश सडेकरांनी अग्नी दिला आणि चिता धडाडली. अकस्मात शब्द आणि सूर ऐकू यायला लागले…

‘चल अकेला, चल अकेला,

तेरा मेला पीछे छुटा राही, चल अकेला’

हे संपलं तोच दुसरं गाणं ऐकू यायला लागलं…

‘ये रात फिर ना आयेगी…’

अशी वेगवेगळी गाणी चाहते म्हणतच होते. शेवटी कुणीतरी म्हणायला सुरुवात केली,

‘दिल की हर बात अधुरी है, अधुरी है अभी,

अपनी एक और मुलाकात जरुरी है अभी,

चंद लम्हों के लिये साथ का वादा करो,

फिर मिलेंगे कभी इस बात का वादा करो…’

चितेला अग्नी दिला गेला आणि ती भडाडून पेटली. चितेला गीताग्नी दिलेलं हे एकमेव उदाहरण असेल.

हास्य व्यंगकवी काका हाथरसी हे एक अजब व्यक्तिमत्त्व होतं. मंचीय हास्य व्यंगकवितेचा नायक अशी प्रतिमा त्यांनी आयुष्याच्या अखेरीपर्यंत टिकवली. त्यांनी म्हटलंय…

‘कविता लिखते रहेंगे,

जब तक दम मे दम

पर जाये तब बताये,

कहां आ गये हम

कहां आ गये हम,

हास्यरस है रग रग मे,

लूट रहे है पुण्य,

बाटकर हास्य जगत मे

फिर भी यम के इन नरक मे ले जायेंगे

रिश्वत देकर स्वर्ग मे घुस जायेंगे!’

अशा या कवीने आपली इच्छा काय लिहून ठेवली, तर माझी शवयात्रा उंटाच्या गाडीवरून काढा. अंतिम संस्काराच्या वेळी लोकांनी हास्यकवी संमेलन भरवावं आणि हास्याच्या गडगडाटात मला निरोप द्यावा!

19 सप्टेंबर 1995 ला काका हाथरसी यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा उंटाच्या गाडीतून त्यांची अखेरची यात्रा सुरू झाली. याशिवाय यात्रेत पन्नासएक हजार लोक सामील झालेले होते. स्मशानात दोन तास हास्यकवी संमेलन झालं.

…असेही शेवटचे निरोप… असेही अखेरचे निरोप…असेही वेगळे असतात.