नोकऱ्यांवर गदा, उद्योग बंद, महागाई वाढली! रिझर्व्ह बँकेचे खळबळजनक सर्वेक्षण

1605

नोकऱ्यांवर गदा आलीय, उद्योगधंदे बंद पडत आहेत, महागाई वाढली आहे. तरीही केंद्रीय अर्थ मंत्री म्हणतात, ही आर्थिक मंदी नव्हे! मंत्र्यांना काहीही वाटू दे; पण जनतेला मात्र देशाची आर्थिक तब्येत बिघडतेय असेच वाटत आहे. म्हणूनच त्यांचा विश्वास उडत चालला आहे, असे धक्कादायक सर्व्हेक्षण रिझर्व्ह बँकेनेच केले आहे. लोकांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा धसका घेतलेला दिसतो, असे या सर्व्हेक्षणात स्पष्टपणे म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेने तिमाही पतधोरणांसह कन्झ्युमर्स सेंटिमेंट सर्व्हेही सादर केला. हा सर्व्हे म्हणजे देशातील जनतेचे सेंटिमेंटच असल्याचे उघड झाले आहे. एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. भविष्यात ही स्थिती आणखीनच बिकट होईल आणि जगणे कठीण होईल, अशी भीतीही लोकांनी व्यक्त केली आहे.

लोक खरेदी करायला घाबरतात
रिझर्व्ह बँकेने आपल्या सर्व्हेक्षणाच्या अहवालात गेल्या तीन महिन्यांच्या आर्थिक धोरणांचा आढावा घेतला आहे. या धोरणांचा थेट रोजगार, उत्पादन आणि खरेदी करण्याच्या लोकांच्या क्षमतेवर इतका परिणाम झाला आहे की, गेल्या सहा वर्षांत कधी नव्हे इतके लोक घाबरलेले आहेत. रोजगार कमी झाल्यामुळे लोक खरेदी करायला घाबरू लागले आहेत, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) घसरून 5 टक्क्यांवर पोहोचले आहे.

देशातील 13 महत्त्वाच्या शहरांमधील 5 हजार 192 कुटुंबांचे मत या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले.
देशाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे असे 47.9 टक्के लोकांना वाटते. तर 33.5 टक्के जणांना वाटते की, परिस्थिती सुधारत आहे. ही परिस्थिती एक वर्षानंतर सुधारेल, असे 53 टक्के लोकांना वाटते.
बेरोजगारीची समस्या वाढली आहे असे 52.5 टक्के लोकांना वाटते, तर 33.5 टक्के लोकांना ही परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत जाईल, असे वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या