हप्त्यांमध्येही जमा करू शकता पैसे; ‘या’ एफडीवर मिळतो चांगला परतावा

अनेकजण सुरक्षित गुंतवणूक म्हणून बँकेतील एफडीला (मुदत ठेवी) प्राधान्य देतात. एफडीमधील गुंतवणूक सुरक्षित असते. तसेच त्यावर चांगले व्याजही मिळते. आता काही बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. तसेच शेअर बाजारात सध्या अस्थिरतेचे वातावरण असल्याने अनेक गुंतवणूकदार एफडीला प्राधान्य देत आहेत. काही बँका आता एफडीवर 8 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. आता आरबीएल बँकेने (RBL Bank New FD Plan) गुंतवणूकदारांसाठी एक विशेष एफडीची योजना सुरू केली आहे. या फ्लेक्सिबल फिक्स्ड डिपॉजिट योजनेत नियमित मासिक बचत तसेच टॉपअपचीही सुविधा मिळत आहे.

बँकेच्या या योजनेत गुंतवणूकदार एक हजार रुपयांपासून गुतंवणूक करू शकतात. तसेच या एफडीमध्ये टप्प्याटप्प्याने किंवा हप्त्यांमध्येही यातील गुंतवणूक वाढवता येऊ शकते. फ्लेक्सिबल एफडी योजनेद्वारे गुंतवणूकदारांना टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीची सुविधाही देण्यात येत आहे. विशेष म्हणजे या योजनेत चक्वाढ व्याजाचाही फायदा मिळतो.मासिक बचत आणि टॉपअप केलेली रक्कम यावर मॅच्युरिटीवेळी समान व्याजदर मिळतो. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करत गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळू शकतो.

या योजनेत गुंतवणूकदारांना 7.55 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.5 टक्क्यांनी 15 महिन्यांसाठी व्याज मिळते. तसेच सुपर सिनियर योजनेत 8.30 टक्के व्याज मिळते. या योजनेत गुंतवणूकदार कमीतकमी म्हणजे 50 रुपयेही टॉपअप करू शकतो. या योजनेचा अवधी जास्तीतजास्त 60 महिने आणि कमीतकमी 6 महिने आहे. तसेच या योजनेत 1 हजार रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करता येऊ शकते.