फेरपरीक्षा पुढे ढकलण्याची विद्यापीठावर नामुष्की, बीएडचे विद्यार्थी वेटिंगवरच

26

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या गोंधळी कारभाराचा फटका बीएड प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. आजपासून सुरू होणाऱया बीएडच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक अचानकपणे रद्द करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा कधी होणार हेदेखील विद्यापीठाने जाहीर केलेले नाही. जानेवारीमध्ये पार पडलेल्या सेमिस्टर 1 चा निकाल जाहीर न करताच विद्यापीठाने फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले, पण चूक लक्षात आल्यावर तडकाफडकी फेरपरीक्षा पुढे ढकलली आहे.

आजपासून (15 एप्रिल) बीएड प्रथम वर्ष सेमिस्टर 1 ची फेरपरीक्षा होणार होती. पण अचानकपणे विद्यापीठाने ही परीक्षाच पुढे ढकलली. बीएडचे तीन पेपर होणार होते. आज 15 एप्रिलला चाईल्डहूड ऍण्ड ग्रोईंग अप, 18 एप्रिलला नॉलेज ऍण्ड करिक्युलम आणि 26 एप्रिलला इंटरडिसीपलीनरी कोर्स 1 – जेंडर स्कूल सोसायटी असे पेपर होणार होते. पण लोकसभा निवडणुकीचे कारण पुढे करत विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलल्याचे म्हटले आहे. याविषयी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही. विद्यापीठ परीक्षा विभागाच्या या अनागोंदी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून जानेवारीमध्ये पार पडलेल्या परीक्षेचा निकाल आधी जाहीर करण्याची मागणी केली आहे.

जानेवारीमध्ये बीएडची परीक्षा पार पडली होती. 28 ते 30 जानेवारी दरम्यान पेपर झाले. परीक्षा झाल्यावर किमान 45 दिवसांत निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. पण आता 90 दिवस होऊनही या परीक्षेचा निकाल जाहीर झाला नसल्याचे स्टुंडट लॉ कौन्सिलचे सचिन पवार यांनी सांगितले. हा निकाल जाहीर न करताच पुढील परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केल्याने विद्यार्थी पुरते गोंधळात पडले होते. आम्ही पास आहोत की नापास हेच समजले नाही तर फेरपरीक्षा द्यायची की नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. अखेर विद्यापीठालाच उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. त्यांनी फेरपरीक्षाच पुढे ढकलली.

येत्या दोन दिवसांत निकाल जाहीर होईल
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीएड फेरपरीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे. बीएड सेमिस्टर 1 चा निकाल अद्याप जाहीर झाला नसून तो येत्या दोन दिवसात जाहीर होईल.
– विनोद मळाळे, उपकुलसचिव – जनसंपर्क, मुंबई विद्यापीठ

आपली प्रतिक्रिया द्या