मध्यांतर… पण थांबेल ती मनोरंजनसृष्टी कसली?

1223

कोरोनाचा फटका सर्व क्षेत्रांप्रमाणे मनोरंजन क्षेत्रालाही बसलाय. शूटिंग ठप्प झाले, सिनेमा-नाटय़गृहे बंद पडली अन् हातावर पोट असलेल्या पडद्यामागील कामगारांवर उपासमारीची वेळ आली. एकंदरीत, लॉकडाऊनमुळे मनोरंजनसृष्टीचे कोटयवधींचे नुकसान झालेय. पण थांबेल ती मनोरंजनसृष्टी कसली? ’तू चल पुढं तुला रं गडय़ा भीती कुणाची…’ असं म्हणत कलाकार एकमेकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. गरजू कलाकारांसाठी मदतनिधी उभारण्यापासून ते भविष्यात येणाऱया नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

– गेले दोन महिने नाटयसृष्टी लॉकडाऊन आहे. गेल्या एका महिन्यात नाटय़क्षेत्राचे 25 कोटींचे नुकसान झालंय. हा महिनाही असाच गेलाय. त्यामुळे 50 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
– दोन महिन्यात चित्रपटसृष्टीचे नुकसान सुमारे 2500 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
– सध्या 70 हिंदी, 40 मराठी आणि 10 ओटीटी अशा 110 मालिकांची चित्रीकरणे कोरोनामुळे थांबली असून त्यावर अवलंबून असलेल्या 3 लाख कामगार व तंत्रज्ञांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला आहे. 5 हजार कोटींची गुंतवणूक हिंदी मालिकांची तर 250 कोटींची गुंतवणूक मराठी मालिकांची यात आहे.

व्यवस्थापक, बुकिंग क्लार्क अडचणीत
व्यवस्थापक, बुकींग क्लार्क संघटनेत एकूण 85 जण आहेत. त्यामध्ये बुकिंग क्लार्क 30 तर व्यवस्थापक 55 आहेत. सगळ्यांचीच कमाई ठप्प झालेय. व्यवस्थापक, बुकींग क्लार्क यांना प्रत्येकी 2500 रुपयांची मदत नाटक समूहाकडून मिळाली. प्रदीप कबरे यांच्या कलाकार संघाकडून रेशन कीट्स मिळाले. रंगमंच कामगार संघाने अन्नधान्याची मदत दिलेय. निर्माता संघ मदतीला तयार आहेत. त्यांची मिटींग होणार आहे.
– हरी पाटणकर, सेक्रेटरी व्यवस्थापक, बुकींग क्लार्क संघ

नाटय़कर्मी मदत निधी उभारणार!
आगामी काळात नाटय़सृष्टीचे 100 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन नाटय़परिषदेने 10 कोटी रुपयांचा नाटयकर्मी मदत निधी उभारण्याचे ठरवले आहे. केवळ आपत्ती आली की निधी संकलन करण्यापेक्षा हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवणे आवश्यक आहे. मराठी रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या नाटय़ परिषदेने आतापर्यंत निधी संकलनाकडे लक्ष दिले नाही. ही तशी चूक झालीय. निधी उभारण्याचे काम यापुढे सुरूच ठेवू, त्याला कोरोना संकटापुरते मर्यादित ठेवणार नाही. लवकरच आम्ही एसओपी करू. मराठी रंगभूमी आणि यशवंत नाटयमंदिर या दोघांच्या अनुषंगाने नाटय़परिषदेला एसओपी तयार करावा लागेल
– प्रसाद कांबळी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद

निर्मात्यांना कर्ज, अनुदान हवंय
संकटातून निर्मात्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना विनातारण कर्ज तसेच कमी व्याजाचे कर्ज दिले पाहिजे. याशिवाय मनोरंजनसृष्टी वाचवायची असेल तर एक पडदा चित्रपटगृहाना वाचविणे, गरीब संगीतकारांना मदत, मराठी चित्रपटांना अनुदान रक्कम देणे, चित्रपटनिर्मितीवरील जीएसटी माफ करणे, सांगली-कोल्हापुरात चित्रीकरणाला परवानगी देणे अशा आमच्या मागण्या आहेत.
– नितीन वैद्य, निर्माते

चित्रपट महामंडळ आशावादी
मनोरंजनसृष्टीला भेडसावणाऱया अनेक समस्यांवर नुकतीच कलाकार, निर्माते यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यात रोजंदारीवर काम करणाऱया कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा विचार करता ग्रीन झोनमध्ये शूटिंगला आणि सोशल डिस्टंन्सिंग ठेऊन थिएटर सुरू करण्यास परवानगी, पोस्ट प्रॉडक्शनच्या कामांना परवानगी, निर्मात्यांना अंशतः अनुदानाचे वाटप आदी मागण्या करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी देखील बहुतेक मागण्यांवर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
– मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

रंगमंच कामगारांना मदतीचा हात
लॉकडाऊनमध्ये मेकअप आर्टिस्ट, साऊंडवाला, म्युझिक ऑपरेटर, लाईट्समॅन, प्रॉपर्टी आणि सेट लावणारे, ड्रायव्हर आदी सर्व बॅकस्टेज आर्टिस्टचा संघर्ष सुरू आहे. त्यांच्यापर्यंत पहिली मदत रंगमंच कामगार संघाची पोचली. सदस्याला प्रत्येकी दोन – दोन हजार रूपये दिले. ’कलाकार फॉर महाराष्ट्र’ या कलाकारांनी केलेल्या आवाहनातून मिळालेल्या निधीतून आम्ही एप्रिल महिन्यात 700 सदस्यांना प्रत्येक एक हजार रुपये आणि 15 दिवसांचे धान्याचे कीट दिले. हे काम एप्रिल महिन्यात केले. त्यानंतर मे महिन्यात मदतीचा दुसरा टप्पा सुरू झालाय. नाटय परिषदेने 500 अन्नधान्य कीट्स दिले. स्वतः नाटय परिषद निधी उभा करीत आहे. त्यातून रंगमंच कामगारांना पुढच्या आठवडय़ात मदत सुरू होईल.
– रत्नाकर जगताप, अध्यक्ष, रंगमंच कामगार संघ

विविध पातळीवर उपाययोजना सुरू!
कदाचित, मालिकांचे शूटिंग लवकरच सुरू होईल. पण थिएटर बंद असल्याने नाटक आणि सिनेमांना आणखी झळ सोसावी लागेल. आता प्रेक्षक देखील तिथे येणार नाहीत. त्यामुळे त्यासाठी वेगळ्या मार्गाचा विचार करावा लागेल. पण आलेलं संकट देखील नवा मार्ग दाखवते. तसे मार्ग लवकरच मिळतील. मनोरंजनसृष्टीला भेडसावणाऱया समस्यांबद्दल नुकतीच आम्ही कलाकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली.

– सुबोध भावे, अभिनेता

पुरेशा काळजीसह शूटिंग शक्य !
आता लगेच चित्रपट, मालिकांचे शूटींग सुरू करणे सोपे नाही. नाही म्हटलं तरी सेटची जुळवाजुळव करायला दीड- दोन महिने जातात. मला सद्यस्थितीत एक चांगला पर्याय दिसतोय. तो म्हणजे इतर उद्योगधंदे, कारखान्यांना जशी ग्रीन झोनमध्ये परवानगी देण्यात आलेय. त्याच धर्तीवर आमची इंडस्ट्री ग्रीन झोनमध्ये सुरू करता येईल. समजा मला वेबसीरीज सुरू करायची आहे. अशावेळी कर्जत परिसरात फार्म हाऊस, बंगले, रिसोर्ट भाडेतत्वावर शूटिंगसाठी मिळतात. तिथे कमीत कमी स्टाफसह सर्वांची मेडिकल तपासणी करून पोहोचायचे. ग्रामपंचायतीची पूर्वपरवानगी घ्यायची. आरोग्य सुरक्षेचे सगळे नियम पाळायचे. 14 दिवस लोकेशनच्या बाहेर कुणी जाणार नाही याची काळजी घ्यायची. रोजच्या जीवनावश्यक गोष्टींसाठी स्थानिक कॉर्डिनेटर नेमायचा.असं ठरवून सध्या इंडस्ट्री सुरू करता येईल.

– सुशांत शेलार, प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ

आपली प्रतिक्रिया द्या