जगण्यातला आनंद : वाचनाची जादू

>>ज्योती बर्दापूरकर-शास्त्री

सहसा मनोरंजनासाठी माणूस पुस्तके वाचतो. वाचनाने ज्ञान मिळते व ज्ञानाच्या कक्षाही रुंदावल्या जातात. शब्दसंपत्तीत भर पडते. ज्ञान ही अशी संपत्ती आहे की जी आपल्यापासून कोणी चोरून घेऊ शकत नाही.

आज काव्य, कथा, कादंबर्‍या, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, ललित साहित्य, इतिहास, भूगोल, विज्ञान, धर्म, तत्त्वज्ञान, राजकारण व अशा विपुल प्रमाणात वाचनसाहित्य उपलब्ध आहे याचा आस्वाद घ्यायला आपले आयुष्यही अपुरे पडेल.

आत्मचरित्र! आत्मचरित्रे कशासाठी वाचावीत? थोर लोक आपल्या आत्मचरित्रातून आपल्याशी बोलतात. त्यांचे अनुभव व त्यांच्या हृदयातील गोष्टी आपल्याला सांगतात. त्यांचे मौल्यवान विचार आपल्याला देतात. जे त्यांना मिळवायला कष्ट पडले ते त्यांचे आत्मचरित्र वाचल्याने आपल्याला अगदी कमी वेळात व सहज मिळते.

योग्यवेळी योग्य पुस्तक वाचायला मिळाले तर आपले आयुष्य बदलू शकते. आपल्या आयुष्याला कलाटणीही देऊ शकते. एक वाक्य एखाद्याचे भविष्य बदलू शकते. एक वाक्य आयुष्याचे ध्येयही ठरवू शकते. म्हणून ज्या पुस्तकांत आयुष्य बदलायची ताकद आहे अशी पुस्तके वाचा. रोज नियमित १५ ते २० मिनिटे तरी वाचन करा. प्रसिद्ध गायिका आशा भोसले (मंगेशकर) यांनी तरुणपणी खूप कथा व कादंबर्‍या वाचल्या. त्याचा त्यांना गाण्यातून योग्य भावना व्यक्त करण्यासाठी (गाताना) उपयोग झाला असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

प्रवासवर्णन! प्रवासवर्णन का वाचावे? तर खूप कमी वेळात आणि कमी पैशांत जग फिरण्याचा अनुभव आपल्याला मिळतो. जगातील सर्व मोठे, यशस्वी लोक मोठे वाचक आहेत. प्रत्येक चांगला वाचक हा चांगला नेता असेलच असे सांगता येत नाही, पण चांगला नेता हा चांगला वाचक नक्कीच असतो. याचे योग्य उदाहरण म्हणजे अमेरिकेचे सर्वात प्रभावी व महान अध्यक्ष अब्राहम लिंकन.

अब्राहम लिंकन यांना वाचनाचे जबरदस्त वेड होते. फक्त एकच वर्ष ते शाळेत गेले असतील. ते सात वर्षांचे होते तेव्हा सात दिवसांतील काही दिवसच ते शाळेत जायचे. त्यामुळे त्यांना अक्षरओळख झाली. अर्धवट जळालेल्या काडीचा वापर करून ते हाताने बनवलेल्या बोर्डावर लिहिण्याचा सराव करीत. पंधरा-सोळाव्या वर्षी ते शेजार्‍यापाजार्‍यांकडून पुस्तक आणून वाचत. लहानपणी खेळण्याच्या वयात ते एका झाडाखाली बसून पुस्तके वाचत.

पहिली नोकरी त्यांनी कारकुनाची, तर दुसरी पोस्टमास्तरची केली. ग्राहक नसताना मिळालेल्या वेळात ते तत्त्वज्ञान, धर्म, राजकारण, साहित्य या विषयांवरची पुस्तके वाचत. त्यामुळे केवळ वाचनाने त्यांनी प्रथम दर्जाच्या महाविद्यालयाची डिग्री मिळवली.
उच्च दर्जाचे शिक्षण नसतानाही त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस करायची सनद मिळवली. ‘जगात पुढे जायचे असेल तर वाचन हे सर्वोत्तम साधन आहे’ ही गोष्ट त्यांना आयुष्यात फार लवकरच समजली. त्यामुळे एक गरीब, खेडवळ व अर्धवट शिक्षण झालेला मुलगा जगातील महान व्यक्ती झाला. तसेच ए. पी. जे. अब्दुल कलाम हे एक नावाड्याचं पोरगं होतं. केवळ वाचनामुळे ते हिंदुस्थानचे सर्वात प्रभावी व राष्ट्रपती बनले. ते राष्ट्रपती बनले तेव्हा त्यांच्याजवळ सामान होते एक पेटी कपडे व दुसरी पेटी पुस्तकांनी भरलेली. मी माझा अनुभव सांगते. मी मुख्याध्यापिका असताना ‘यश तुमच्या हातात’ हे शिव खेरा या लेखकाच्या पुस्तकातील एक पान रोज रात्री झोपण्यापूर्वी वाचत असे. त्यातून मला मुख्याध्यापक म्हणून काम करताना प्रेरणा मिळत गेली व त्यामुळे मी एक यशस्वी मुख्याध्यापिका बनले.

तुम्हाला नेमके काय हवे आहे हे ठरविल्यानंतर त्यासंदर्भात वाचत गेल्याने तुम्हाला त्या दिशेने जाण्याच्या योग्य कल्पना सुचत जातात. एकच पुस्तक किंवा निवडक पुस्तके पुन: पुन्हा वाचल्याने नवीन गोष्टी उमजत जातात व त्यातून नव्या नव्या कल्पना जन्म घेतात. जी पुस्तके तुम्हाला जास्तीत जास्त विचार करायला लावतात ती तुम्हाला सर्वात जास्त मदत करतात. त्यामुळे विचारही बदलतात.

अमेरिकेत अँड्र्यू कार्नेजी नावाचा एक फार मोठा व थोर माणूस होऊन गेला. शंभर वर्षांपूर्वीच तो कोट्यधीश होता पण त्याने आपल्या मृत्युपत्राद्वारे आपली धनसंपत्ती आपल्या मुलांना दिली नाही तर त्या पैशांचा वापर करून अमेरिकेतील जास्तीत जास्त खेडेगावांमध्ये वाचनालये बांधण्यात यावीत असे लिहून ठेवले होते. अमेरिकेतल्या कुठल्याही खेड्यात गेले तरी तेथे या अँड्र्यू कार्नेजीच्या पैशांमधून बांधण्यात आलेले एक तरी वाचनालय असतेच. यावरून त्यांच्या महान कार्याची कल्पना येते.