वाचाल तर…

532

>>दिलीप जोशी<<

[email protected]

दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडी वाचित जावे’ असं संतवचन आहे. आता लिखाण प्रत्येकालाच जमेल असं नाही, पण वाचन सहजसोपं आहे. अर्थात त्यासाठी आधी अक्षरओळख हवी आणि त्यानंतर वाचनाची आवड विकसित व्हायला हवी.

अनेकांना चार-दोन ओळी वाचल्या की झोप येते. वाचन ही मेंदूला जडत्व आणणारी नव्हे तर चैतन्य देणारी गोष्ट आहे हे वाचनाची सवय जडल्यानंतर उमगतं. माणसाच्या इतिहासातला बराच काळ हा मौखिक वाङ्मयाचा आहे. अक्षर, शब्द, भाषा, मग व्याकरणासहित भाषा असे टप्पे ओलांडत पुढे पुस्तकी वाचन संस्कृती उदयाला आली. तोपर्यंत पाठांतराने गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होत्या. तरीसुद्धा आपल्याकडे रामायण, महाभारत आणि पाश्चात्त्य देशातही महाकाव्यं लिहिली गेली. भूर्जपत्र म्हणजे विशिष्ट झाडाच्या खोडाच्या पातळ कागदासारख्या पापुद्र्यावर लिखाण केलं जायचं.

कालांतराने चीनमध्ये कागदाचा शोध लागला असं म्हणतात. कागदाचा शोध लागल्यावर मात्र मनातले विचार बोरू शाईत बुडवून बोरूबहाद्दरी सुरू झाली ती आजतागायत विविध रूपं बदलत सर्वव्यापी होत आहे. हाती लिखाणानंतरच्या काळात जेव्हा छपाईचं तंत्र विकसित झालं तेव्हा एकाच लेखनाच्या हाताने अनेक ‘नकला’ काढण्याचं प्रयोजन उरलं नाही. छपाईचे ठसे एकच मजकूर अनेक कागदांवर उमटवू लागले.

आरंभीच्या काळात हा उद्योगही हातानेच चालायचा, पण नंतर यांत्रिक छपाईने फार मोठी क्रांती घडवली. अक्षरांचे पोलादी ‘खिळे जुळवण्याची’ पद्धत तर आजही कुठे वापरात असेल. नंतर मोनो, लायनोटाइप आणि त्यापुढची पायरी म्हणजे सध्याचं जगभर मान्यता पावलेलं ऑफसेट प्रिंटिंग इथपर्यंत छपाईने सफाईदारपणा आला.

प्राचीन पुस्तकांत चित्रं असत तीसुद्धा चित्रकाराने हाताने चितारलेली असत. राजाला भेट देण्याच्या ग्रंथाची शाई सोन्याच्या वर्खाची असायची आणि अप्रतिम नक्षीकामाने नटलेला ग्रंथ तयार व्हायचा.

यंत्रयुगाने हळूहळू जग खरोखरच जवळ आणलं. आगगाडी ते विमान या प्रवासातील क्रांतीमुळे जगाच्या या टोकाची मंडळी सहजतेने त्या टोकाला जाऊ लागली. मग देशोदेशीचे आचारविचार, संस्कृती, पर्यटन या सगळय़ांवर भरपूर लिखाण होऊ लागलं त्याचबरोबर त्या त्या देशातील विद्वानांनी लिहिलेले प्राचीन ग्रंथही सहज सर्वत्र उपलब्ध होऊ लागले. महाकवी कालिदासाचं ‘शाकुंतल’ नाटक वाचून जर्मन कवी गॉइटे (गटे) आनंदून गेला. पूर्वी जे ज्ञान केवळ वाचिक म्हणजे केवळ बोलण्यातून व्यक्त होणारं होतं ते आता वाचनातून जाणून घेता येऊ लागलं. तत्त्वज्ञानापासून विज्ञानापर्यंत सर्व विषयांवर पुस्तकं येऊ लागली.

पुस्तकी ज्ञान आणि परस्वाधीन जिणं काय कामाचं अशी पूर्वी एक म्हण होती. त्यातल्या परस्वाधीन जिण्याचा अर्थ तर स्पष्टच आहे, पण ‘पुस्तकी ज्ञान’ म्हणजे पुस्तकात असलेलं पण मनन करून आत्मसात न केलेलं ज्ञान काय कामाचं असा एक अर्थ निघायचा किंवा केवळ पढतमूर्खासारखं पुस्तकी असण्याकडे त्याचा रोख असायचा. यात अर्थातच दोष पुस्तकाचा नाही. ते वाचणाऱयाचा आणि त्यावर विचार करणाऱ्याचा आहे. म्हणूनच इंग्लिशमध्ये ‘टू रीड बिटवीन द लाइन’ म्हणजे छापलेल्या दोन ओळींच्या मधला (कोऱया जागेतला) आशय वाचायला शिकावं असं म्हटलं जातं. कोरी जागा वाचणं शक्य नाही ही गोष्ट हे वचन लिहिणाऱ्यालाही कळत असणारच. त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा की, निव्वळ शब्दाक्षरांपेक्षा लेखनातून ध्वनित होणारा भाव समजून घेणं महत्त्वाचं.

अलीकडे नवी पिढी वाचत नाही असं म्हणतात, पण किंडलवर शेकडो पुस्तकं साठवणारे आणि वाचणारे तरुण आहेत. पुस्तकं, नियतकालिके, एवढंच नव्हे तर वृत्तपत्रांचाही प्रभाव इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या युगातही कमी झालेला नाही. कालांतराने तो तसा होईलही कदाचित, पण आजही हाती पुस्तक घेऊन वाचन समाधीचा अनुभव घेणे जगातल्या कोटय़वधी लोकांना आवडतं. हस्तलिखिते, कागदावरचं मुद्रण यांचा पुढचा टप्पा इलेक्ट्रॉनिक वाचनाचा असला तरी बदलत्या माध्यमातूनही प्रसंगी अखंडी वाचत राहणारा समाज निर्माण होईलच.

अर्थात काय वाचायं, काय वाचू नये याचं तारतम्यही विस्तृत वाचनातूनच येतं. कारण वाचन विचार देतं. प्रत्येक विचार आपल्याला पटेलच असं नसतं. म्हणजेच वाचन विचार करायलाही लावतं. त्यासाठीच वाचनाची गोडी वाढवली पाहिजे. आपण एकटं असताना पुस्तकं मित्राची जागा भरून काढतात. म्हणून प्राचीन हिंदुस्थानात नालंदा, तक्षशीला येथे भव्य ग्रंथालये होती. तेथील विद्यार्थी लेखन, वाचन, चर्चा करीत. समाज पुढे जाण्यासाठी जे वैचारिक मंथन व्हावं लागतं ते वाचनाने समृद्ध करता येतं. २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस म्हणून त्यासाठीच साजरा होतो.

आपली प्रतिक्रिया द्या