कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला तयार, मुंबईकर रोहित शर्माचे उद्गार

रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ या वर्षी पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनला. आता मुंबईचा हा पठ्ठय़ा हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झालाय. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तो दुखापतीमधून बरा होतोय.

ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी त्याने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येऊन फलंदाजी करायला नक्कीच आवडते, पण संघ व्यवस्थापन जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करायला तयार आहे.

पर्थ वगळता इतर ठिकाणी चेंडूला बाऊन्स मिळत नाही

रोहित शर्माला ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ांवर विचारले असता तो म्हणाला, पर्थ वगळता मेलबर्न, सिडनी, अॅडलेड येथे चेंडूला बाऊन्स अर्थातच उसळी मिळत नाही. जोश हेझलवूड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्प यांच्यापैकी पुणीही सलामीला गोलंदाजी केली तरीही ते बाऊन्स क्वचितच टाकतील. चेंडू स्विंग करण्याकडे त्यांचा भर असेल, असेही तो पुढे सांगतो.

योजना रेडी असतील

टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ, खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये पोहचले आहेत. आगामी दौऱ्याबाबत आखणी, योजना तयार करण्यात आल्या असतील. विराट कोहली मायदेशी आल्यानंतर त्याची जागा कोण घेईल, सलामीला कोणत्या फलंदाजांना पाठवण्यात येईल याबाबत चर्चा झाल्या असतील. मी जेव्हा तिथे पोहचीन तेव्हा मला समजेल, पण मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करायला तयार आहे असे रोहित शर्मा आवर्जून म्हणाला.

बेसिक्स ठरते महत्त्वाचे

कसोटी क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी बेसिक्स म्हणजेच मूलभूत गोष्टींवर लक्ष द्यावे लागते. त्यानंतर मानसिकदृष्टय़ा तुम्ही तयार होता. माझ्या कारकीर्दीत असंख्य चढउतार बघितले आहेत. दुखापतीनंतर किंवा सुमार फॉर्मनंतर झोकात पुनरागमनही केले आहे. त्यामुळे किती महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय याकडे जास्त लक्ष देत नाही. प्रक्रियेवर लक्ष देतो, असे रोहित शर्मा नमूद करतो.

आपली प्रतिक्रिया द्या