अबब..! प्रत्येकाला 35 लाखांचा बोनस, आकडा पाहून कर्मचाऱ्याचे डोळे पाणावले

2010

कोणत्याही कंपनीत एक किंवा दोन महिन्यांचा पगार बोनस म्हणून देण्यात येतो. मात्र, अमेरिकेतील रिअल इस्टेट क्षेत्रातील एका कंपनीने दिलेल्या बोनसच्या रकमेचा आकडा पाहून कर्मचाऱ्यांना आनंदाश्रू अनावर झाले. या कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्याला 35 लाखांचा बोनस दिला आहे. कपंनीत एकूण 198 कर्मचारी आहेत. त्या सर्वांना 35 लाखांचा बोनस देण्यासाठी कंपनीने 71 कोटी रुपये खर्च केले आहेत. बोनसचा चेक घतल्यावर कर्मचाऱ्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते.

अमेरिकेतील बाल्टीमोर येथील सेंट जॉन प्रॉपर्टीज नावाच्या कंपनीने हॉलिडे पार्टी आयोजित करून बोनस देण्याची घोषणा केली. प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळानुसार बोनस देण्यात आला आहे. मात्र, सर्वाधिक कर्मचाऱ्यांना 35 लाखांचा बोनस मिळणार आहे. कंपनीने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळेच आम्ही कर्मचाऱ्यांना चांगला बोनस देऊ शकलो, असे कंपनीने म्हटले आहे. अमेरिकेतील 8 राज्यांमध्ये कंपनीने ऑफीस, रिटेल स्टोर आणि गोदामे यांच्यासाठी 2 कोटी चौरस फूटांची जागा आहे. त्याचा कंपनीला मोठा फायदा होत आहे.

कंपनीने एवढ्या मोठ्या प्रमाणात बोनस दिल्याने आमचे आयुष्य बदलणार असल्याचे कंपनीच्या अकाउंट स्पेशालिस्ट डेनिएल वेलेन्जिया यांनी सांगितले. आपण या कंपनीत 19 वर्षांपासून काम करत आहोत, त्या कामाचे सार्थक झाले आहे, असे डेनिएल यांनी सांगितले. विशेष म्हणजे हॉलीडे पार्टीत घोषणा करण्यात आलेला हा बोनस दरवर्षी देण्यात येणाऱ्या बोनसपेक्षा वेगळा देण्यात येणार आहे. कपंनीने चांगली कामगिरी करून मोठा नफा कमावला आहे. हा आनंद आपल्याला कर्मचाऱ्यांसोबत साजरा करायचा होता. त्यामुळे हॉलीडे पार्टी आयोजित करून या बोनसची घोषणा करण्यात आल्याचे कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष एडवर्ड जॉन यांनी सांगितले. तसेच कंपनीसाठी काम करणाऱ्या आणि कंपनीच्या या वाटचालीत योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना गौरवण्याचा हेतू असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या