दिल्ली डायरी-‘अच्छे दिन’ची ‘जुमलेबाजी’

47
फोटो: पीटीआय

नीलेश कुलकर्णी

‘अच्छे दिन’ या शब्दाची अवस्था नर्मदेच्या प्रवाहातील गुळगुळीत गोटय़ासारखी झाली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपण निष्णात अर्थतज्ञ आहोत आणि आपल्यामुळे अर्थव्यवस्थेला बरकत येईल म्हणजेच देशाला अच्छे दिन येतील असे एका कार्यक्रमात सांगितले होते. त्यानंतर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत याच शब्दाचा गोटा उचलून ‘अच्छे दिन आयेंगे’ असे सांगत सत्ता काबीज केली. आता २०१९ च्या निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेवर आली की मगच ‘खरे अच्छे दिन’ येतील असे गमतीदार विधान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. २०१९ मध्ये जे काही व्हायचे ते होईल. तूर्तास निद्रिस्त अवस्थेत पडलेल्या काँग्रेसला जरी राहुलबाबांनी ‘अच्छे दिन’ आणले तरी पुष्कळ आहे.
नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर जनतेचा त्रास कमी होईल असे भावुक आश्वासन पंतप्रधानांनी दिले होते. मात्र नोटाबंदीमध्ये सामान्य माणूस भरडला गेला. अशा वेळी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाने जनसामान्यांच्या वेदनांना वाचा फोडायची असते. पण काँग्रेसने ६१ दिवसांनंतर केलेले जनवेदना संमेलन म्हणजे ‘कॉमेडी शो’ ठरला. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे राहुलबाबांनी मोठय़ा आवेशात भाषण ठोकले. त्यासाठी ‘नमक हलाल’ वगैरे चित्रपटातील दाखले दिले. राहुल यांनी मोदींची नक्कल करायची आणि मोदींनी राहुलबाबांची खिल्ली उडवायची असा हा नकलांचा खेळ सध्या सुरू आहे. त्याचा आनंद घेत नोटाबंदीचे दुःख जनतेने विसरून जावे अशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची अपेक्षा दिसते.

पंतप्रधान मोदी मंगळयानावरही आपले पोस्टर लावतील अशी टीका राहुल यांनी केली असली तरी काँग्रेसच्या राज्यातही आत्मस्तुतीची अनेक पारायणे झाल्याचे ते सोयिस्कररीत्या विसरले. वास्तविक, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोटाबंदीवरून सरकारला घेरून जनमत आपल्या बाजूने वळविण्याची नामी संधी काँग्रेसकडे होती. मात्र ही संधी काँग्रेसने दवडली. या जनवेदना संमेलनाच्या निमित्ताने सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीत राहुल गांधी काँग्रेसजनांचे आपोआप ‘प्रेरणास्थान’ बनले. अच्छे दिन हे मुळातच मोठे मृगजळ आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेले अच्छे दिन काय किंवा राहुलबाबांनी आश्वासन दिलेले अच्छे दिन काय त्याचा कवडसा आपल्यावर पडणार नाही याची ठाम खात्री सामान्य माणसाला झाली आहे. आम्हाला नकोत तुमचे ते अच्छे दिन, आम्हाला आमचे ‘आम दिन’च जगू द्यात. उगाच अच्छे दिनची जुमलेबाजी करून आमच्या जखमांवर मीठ चोळू नका असे म्हणण्याची वेळ देशातील सामान्य माणसावर आली आहे हेच खरे.

आपली प्रतिक्रिया द्या