मुंबईत खरोखर टोळधाड आली आहे ? सत्य जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा

7192

>> श्वेता पवार-सोनावणे

देशात कोरोना व्हायरसचे संकट असतानाच काही राज्यांमध्ये वाळवंटी टोळ या खादाड व पिकांचे नुकसान करणाऱ्या किड्यांनी हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील या किड्यांनी मोठे नुकसान केले आहे. हे किडे मुंबईत देखील आल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे. मुंबईतील टोळधाडीची दृश्य असल्याचे सांगत काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असतानाच मुंबई महानगर पालिकेतील किटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी मात्र ही अफवा असल्याचे म्हटले आहे.

टोळधाडीबाबत सोशल मीडियावरून व्हायरल होणारी ही माहिती निव्वळ अफवा असल्याचे सांगताना नारिंग्रेकर म्हणाले, ‘मुंबईत अद्याप अशाप्रकारचे काहीही समोर आलेले नाही. मुळात हे किडे शेती असेल त्या ठिकाणी जातात. मुंबईत तशी शेती कुठेही नाही. त्यामुळे ते मुंबईत येणार नाहीत. वाऱ्याच्या वेगासोबत ते मुंबईत आले जरी तरी मुंबईकरांनी घाबरून जायचं कारण नाही. हे किडे नरभक्षी नाहीत. ते मनुष्याला इजा करत नाहीत. ते शेतातील पिकावर जगतात. त्यामुळे ते इथे आले तरी मुंबईत शेत नसल्याने ते त्याच वेगाने दुसऱ्या ठिकाणी जातील.’ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारे ते फोटो व व्हिडीओ हे मुंबईतील नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या