भाजपकडून सापत्न वागणूक; फुटीर खासदारांची कुरबूर, मिंधे गटाची घुसमट

भाजप आणि मिंधे गटाच्या घटनाबाह्य संसारात खटके उडायला सुरुवात झाली असून फुटीर खासदार कमळाबाईच्या वागण्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले आहेत. भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे. ते आम्हाला घटक पक्ष मानत नाहीत, अशी घुसमटच मिंधे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांनी बोलून दाखवली आहे. त्याच वेळी लोकसभेच्या जागावाटपावरूनही मिंधे गट आणि भाजपात ‘बाचाबाची’ झडत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आणि 13 खासदार पक्षाशी गद्दारी करून भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. आमच्यात सर्वकाही आलबेल आहे, असे दोन्ही बाजूकडून दाखवण्यात येत असताना आता मिंधे गटाची घुसमट उफाळून आली आहे. गजानन कीर्तिकर यांनी थेट शब्दांत भाजपची ‘वापरा आणि फेका’ नीती उघड केली आहे.

‘‘आम्ही 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो. आम्हाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक म्हणून दर्जा मिळायला हवा. मात्र भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे,’’ असे कीर्तिकर म्हणाले. एनडीएचा भाग असल्याने सरकारकडून आमची कामे झाली पाहिजेत, अशी अपेक्षा आहे. पण तसे होत नाही, अशी नाराजीही त्यांनी बोलून दाखवली.

लोकसभेच्या जागावाटपावरून खटके

लोकसभा निवडणुकीला अजून अवकाश असला तरी लोकसभेच्या जागावाटपावरूनही भाजप आणि मिंधे गटात खटके उडू लागले आहेत. मिंधे गटाला 22 जागा लढायच्या आहेत तर भाजपने मात्र मिशन 45 हाती घेत मिंध्यांच्या पोटात गोळा आणला आहे. यातून दोन्ही बाजूने दावे केले जात आहेत. लोकसभेसाठी भाजप व आमचा 26-22चा फॉर्म्युला तयार आहे, असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले. तर 22 जागांवर दावा करण्याची गरज नाही, त्या आमच्याच आहेत, असे कीर्तिकर म्हणाले. दुसरीकडे भाजप नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जागावाटप अद्याप झाले नसल्याची प्रतिक्रिया देत मिंधेंना गॅसवर ठेवले.

शिंदे गट म्हणजे पाळलेल्या कोंबडय़ांचा खुराडा – संजय राऊत

तुम्ही जो शिंदे-मिंधे गट म्हणता त्याच्याकडे मी पक्ष म्हणून पाहातच नाही. भाजपाने पाळलेला काsंबडय़ांचा तो खुराडा आहे. गावाला काsंबडय़ांचे खुराडे असतात, कधीही कुठल्याही काsंबडय़ा कापल्या जातात. तशाच या काsंबडय़ाही कापल्या जातील, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली. हा काही पक्ष नाही, काsंबडय़ा कॉक कॉक आरवत असतात. त्याप्रमाणेच ते बोलतात. पक्ष म्हणून त्यांच्याकडे काय बैठक आहे? काय विचारधारा आहे? निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह विकत दिले म्हणजे तो पक्ष ठरत नाही. त्या टोळीने 48 जागा लढवाव्यात. आम्हाला काही फरक पडत नाही. मागच्या लोकसभेत आमचे 19 खासदार होते. या वेळी ती संख्या कायम राहील. कोण शिंदे-मिंधे आहेत त्यांचे पाच खासदारही निवडून येणार नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.