कोविशिल्डचे 57 हजार तर कोवॅक्सिनचे 48 हजार असे एकूण 1 लाख 5 हजार डोस प्राप्त

मुंबई महानगरपालिकेला आज (दिनांक 4 ऑगस्ट 2021) एकूण 1 लाख 5 हजार कोविड प्रतिबंधक लसींचा साठा प्राप्त झाला आहे. यामुळे उद्या, गुरूवार दिनांक 5 ऑगस्ट 2021 पासून कोविड लसीकरण मोहीम पुनश्च सुरु होणार आहे. महानगरपालिकेला प्राप्त लस साठ्यामध्ये कोविशिल्डचे 57 हजार तर कोवॅक्सिनचे 48 हजार डोस समाविष्ट आहेत.

दरम्यान, मुंबई  महानगरपालिका क्षेत्रात शासकीय आणि महानगरपालिका मिळून एकूण 314 लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. यापैकी मुंबईतील 227 निर्वाचन प्रभागांमध्ये मिळून असलेल्या एकूण 270 लसीकरण केंद्रावर आता 18 वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांना थेट जाऊन (वॉक इन) लस घेता येईल.

असे असले तरी गर्भवती महिला, विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, विदेशात नोकरी / व्यवसायासाठी जाणारे नागरिक यांना त्यांच्यासाठी निर्देशित केलेल्या लसीकरण केंद्रावरच लस देण्यात येईल. 227 निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र वगळता इतर सर्व म्हणजे शासकीय व महानगरपालिका रुग्णालयेआणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर प्रचलित पद्धतीप्रमाणेच म्हणजे 50 टक्के नोंदणी आणि 50 टक्के थेट येणाऱ्यांना (वॉक इन) लसीकरण याप्रमाणे कार्यवाही सुरू राहणार आहे.

तसेच, सर्व लसीकरण केंद्रांवर, प्रत्येक सत्रामध्ये पहिल्या डोस साठी 30 टक्के तर दुसऱ्या डोस साठी 70 टक्के लस साठा उपयोगात आणला जाणार आहे. वॉक इन आणि नोंदणी ह्या दोन्ही पद्धतीमध्ये हेच सूत्र पाळले जाणार आहे. उदाहरणार्थ, एका केंद्रांवर जर दिवसभराच्या सत्रात 100 डोस दिले जाणार असतील तर त्यात 30 लस ह्या पहिला डोस घेण्यास येणाऱ्यांसाठी आणि 70 लस ह्या दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्यांना देण्यात येतील.

आपली प्रतिक्रिया द्या