यंदा 16 लाख नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एसबीआय रिसर्चच्या अहवालातून उघड

667

मंदीने अवघ्या देशाला पोखरले असून महागाईचा आलेखही चढताच आहे. अशा परिस्थितीत आता बेरोजगारीही डोके वर काढू लागली आहे. आधीच बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड असताना आता यंदा तब्बल 16 लाख नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळणार असल्याचे एका संशोधन अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे मंदी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबरोबरच आता बेरोजगारी हे नवे आव्हान मोदी सरकारपुढे उभे राहणार आहे.

गेल्या आर्थिक वर्षात एकूण 89.7 लाख रोजगार निर्माण झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने नोकऱया कमी होत गेल्या. एसबीआय रिसर्चने जारी केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात आसाम, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओडिशासारख्या राज्यांमधून पंजाब, गुजरात आणि महाराष्ट्रात मजुरीसाठी जाणाऱया आणि हातावर पोट भरणाऱ्या मजुरांकडून पैसे पाठवण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. हे लक्षात घेता मजुरांची संख्या घटल्याचेही उघड झाले आहे.

कमी पगाराच्या नोकऱ्यांवर गदा
चालू आर्थिक वर्षात 15.8 लाख नोकऱया कमी होणार असून यात प्रामुख्याने कमी पगाराच्या म्हणजेच 15 हजार रुपये मासिक वेतन असणाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. जागतिक मंदीचा उद्योगधंद्यांवर परिणाम झाल्याने लाखो नोकरदारांच्या पोटावर पाय येणार आहे. दरम्यान, 2018-19 च्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात 39 हजारांहून कमी संधी उपलब्ध होणार आहेत.

एप्रिल-ऑक्टोबरदरम्यान ईपीएफओशी 43.1 लाख नोकरदार जोडले गेले. गेल्या वर्षभरातील ही संख्या 73.9 लाख इतकी होती. सप्टेंबर 2017 ते मार्च 2018 दरम्यान एकूण 4 लाख 63 हजार 446 नोकरदार ईपीएफओशी जोडले गेले. 2019 मध्ये ही संख्या 7.50,400 इतकी होती. यंदाच्या आर्थिक वर्षात खासगी क्षेत्रातील 26,490 नोकरदारांच्या नोकऱ्या गेल्या.

आपली प्रतिक्रिया द्या