आर्थिक मंदीची झळ : इनरवेअर कंपन्यांच्या गारमेंटस् विक्रीमध्ये मोठी घट

482

वाहन उद्योगात आलेल्या आर्थिक मंदीची व्याप्ती इतर उद्योगांपर्यंत वाढत आहे. इनरवेअर कंपन्यांच्या अंडरगारमेंटस्च्या विक्रीत मोठी घट आली आहे. विशेषतः अंडरवेअर विक्रीमध्ये मंदी आली आहे. मंदीच्या झळा अंडरवेअर, डायपर उत्पादक कंपन्यांनाही बसत आहेत.

चार प्रमुख इनरवेअर कंपन्यांच्या विक्रीमध्ये एप्रिल ते जून या तीन महिन्यांत मोठी घट दिसून आली. अमेरिकेसह हिंदुस्थानातही अंडरवेअरची विक्री कमी झाली आहे. 10 वर्षांतील ही सर्वात मोठी मंदी इनरवेअर उद्योगात आल्याचे तज्ञांचे मत आहे.

काय आहे अंडरवेअर इंडेक्स?

अमेरिकेच्या यूएस फेडरल रिझर्व्हचे माजी चेअरमन एलन ग्रीनस्पैन यांनी 1970 च्या दशकातमेन्स अंडरवेअर इंडेक्सची थिअरी मांडली. अंडरवेअर विक्रीत जेव्हा घट होते तेव्हा देशाची अर्थव्यवस्था खराब होत असून मंदीच्या दिशेने जात आहे असे संकेत मिळतात, मात्र जेव्हा अंडरवेअर विक्रीत तेजी असते तेव्हा अर्थव्यवस्था सुरळीत असल्याचे स्पष्ट होते असे एलन ग्रीनस्पैन यांनी आपल्या इंडेक्समध्ये मांडले होते. त्यांची ही थिअरी अनेकदा खरी ठरली आहे.

या कंपन्यांची विक्री कमी झाली

  • व्हीआयपी अंडरवेअरच्या विक्रीत गेल्या तीन महिन्यांत 20 टक्क्यांनी घट झाली.
  • डॉलर इंडस्ट्रीजची अंडरगारमेंटस् विक्रीही चार टक्क्यांनी कमी झाली आहे.
  • लक्सच्या अंडरवेअर विक्रीतही घट झाली.
  • पेज इंडस्ट्रीजच्या (जॉकी ब्रँड) अंडरवेअर विक्रीत केवळ दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

खरेदी करताना हात आखडता

आता गरज कशाची आहे हे ओळखून ग्राहक खरेदी करतो. जेव्हा लोक खरेदी करताना हात आखडता घेतात तेव्हा मंदीचे संकेत असतात असे तज्ञांचे मत आहे. पेज इंडस्ट्रीजचे सीईओ वेदजी टिक्कू म्हणाले, अंडरगारमेंटसाठी ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. मुळात बाजारातच ग्राहक कमी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या