दिवाळी विशेष – अशी बनवा फळांची बासुंदी

दरवर्षी दिवाळीला लक्ष्मीला नैवेद्यासाठी नवीन काय गोड पदार्थ करावा असा प्रश्न पडतो. आज आम्ही आपल्यासाठी चक्क मिक्स फळांची बासुंदीची पाककृती आणली आहे. 

साहित्य 

2 लिटर दूध, 2 केळी, 2 संत्री, 1 मोठे सफरचंद, 100 ग्रॅम बिनबियांची द्राक्षे, 2 वाटया अननसाचे तुकडे, (कमीही चालतील.), 1 मोठा चमचा साजूक तूप, 25 ग्रॅम काजू, 25 ग्रॅम बेदाणा, 25 ग्रॅम बदाम, सव्वा वाटी साखर, 4 वेलदोडे पूड

कृती 

सर्वप्रथम दूध निम्मे होईपर्यंत आटवावे. त्यात साखर घालून 5 मिनिटे ढवळावे. खाली उतरवून गार होऊ द्यावे. द्राक्षे पाण्यात भिजत ठेवावी. बेदाणा वेगळ्या भांडय़ात तासभर भिजत ठेवावा. काजू साफ करून ठेवावे. बदामाचे जाड तुकडे करावे. बासुंदीत वेलची पूड मिसळून फ्रिजमध्ये ठेवावी. त्यानंतर छोटया कढईत साजूक तुपात काजू आणि बदामाचे तुकडे परतावे. त्यात भिजवून धुतलेला बेदाणा अलगद परतावा. गार बासुंदीत हा मेवा घालावा. नंतर संत्र सोलून त्याच्या फोडी सुटय़ा कराव्या. वरचा पापुद्रा काढून फोडीचे दोन किंवा तीन लहान तुकडे करावे. सफरचंदाची साल आणि बिया काढून बारीक तुकडे करावे. केळ्याच्या छोटया अर्धचंद्राकृती चकत्या कराव्या. सर्व फळे बासुंदीत मिसळावी. दूध जास्त हवे असल्यास थोडे कंडेन्स मिल्क घालावे. बासुंदी पाहुण्यांना लवकर सर्व्ह करायची असेल तर कंडेन्स्ड फळे, मेवा घालावा, मात्र साखर घालू नये. दाट वाटल्यास थोडे साईसकट दूध किंवा क्रिम घालून मिश्रण सरबरीत करावे.