नवे नवे हवे हवे!

नव्या वर्षातील नवा रुचीपालट…. नवनवीन चवींच्या शोधात पट्टीचे खवय्ये नेहमीच असतात..

नवीन वर्ष… सुरुवात एखाद्या नव्या रेसिपीने करूया… नवीन म्हणजे वेगळ्या प्रकारची क्रिएट केली आहे. यातली एक नॉनव्हेज आहे.. ती मुलांनाही आवडेल अशी घेतली आहे. तर दुसरी हेल्दी डेझर्टसारखी घेतली आहे. या रेसिपीज घेण्यामागचा उद्देश्य असा की, पारंपारिक रेसिपी आपण नेहमीच करतो, पण नव्या वर्षात स्वत: काहीतरी क्रिएट करण्यात वेगळीच मजा असते. तरुणांना ही आवड असते. ही कल्पना घेऊन या रेसिपीज दिल्या आहेत.

सध्या मुलांना चपाती किंवा भात खाण्यापेक्षा नुडल्स भारी आवडतात. म्हणून मुद्दाम त्याच नुडल्स घेऊन, पण त्यात अनहेल्दी चायनिज मसाले न घालता त्या कशा चविष्ट व हेल्दी होतील हे पाहिले आहे. त्यात प्रॉन्स घातले आहेत. ही प्रॉन्सची बिर्याणी बनवली आहे. आपण साधारणपणे चिकन बिर्याणी खातो. पण ही जरा वेगळी प्रॉन्सची बिर्याणी आहे. ही बिर्याणी झटपट बनणारी आहे. त्यामुळे त्याची किचकट अशी रेसिपी नाहीय. नुडल्सही सध्या सहज उपलब्ध होतात. नॉर्मली बिर्याणी बनवायची म्हणजे फार मोठी प्रोसेस असते. पण येथे मी शॉर्ट बिर्याणी रेसिपी दिलीय, जी लगेच बनेल आणि मुलांनाही आवडेल. नुडल्सची ख्याती झटपट जेवण अशीच आहे. त्यानुसारच ही प्रॉन्सची नुडल्सवाली बिर्याणीही झटपट करता येईल. यात आपण कोणत्याही प्रकारच्या नुडल्स वापरू शकतो.

दुसरी रेसिपी इंडियन आहे. पण ती दिसते एकाद्या वेस्टर्न डेझर्टसारखी… आपल्याकडे डेझर्ट म्हटले म्हणजे खूप गोड असतात. ते हेवीदेखील असतात. गुलाबजाम, श्रीखंड, खीर… त्यात लाईट किंवा हेल्दी प्रकार फार कमी पाहायला मिळतात. म्हणून आपल्याकडची माणसं वजन वाढेल म्हणून ही डेझर्ट टाळायला लागतात. म्हणून येथे मी ‘ऍपलची फिरनी’ ही हेल्दी रेसिपी केली आहे. हा मूळचा नॉर्थ इंडियन खाद्यप्रकार… ही फिरनी आपण सफरचंदापासून बनवलीय. त्यामुळेच ती हेल्दीही आहे आणि चविष्टही आहे. त्यात उकडय़ा तांदळाची पिठी घातली आहे. यात साखर वगैरे कमी घातली आहे. कारण ही फिरनी सफरचंदाच्या गरापासून बनवलेली असल्याने मुळातच ती गोड आहे.

याबरोबरच ती हेल्दीही आहे. त्याचे प्रेझेंटेशनही असे केले आहे की ऍपलचाच बास्केट बनवला आहे. कपसारखा केलाय. ऍपल आतून कोरून त्याचा गर काढून तो फिरनीमध्ये वापरला आहे. राहिलेला कपसारखा भाग प्रेझेंटेशनसाठी घेतला आहे. म्हणजे त्यातली फिरनी खाऊ शकतो आणि ती खाऊन झाल्यावर तो कपदेखील खाता येतो. कारण कच्चं फ्रूट खाणंही तब्येतीसाठी चांगलं असतं. या अनुषंगाने डेझर्ट आणि कच्चं फ्रूट घेतलं आहे.नव्या वर्षात नवीन विचाराने आपण प्रेरीत झालेलो असतो. त्यानुसार नव्यानव्या विषयांचा विचार केला तर वर्षभर नवनवीन पदार्थ करण्याची स्फुर्ती मिळेल.

कोळंबी, नुडल्सची बिर्याणी

साहित्य : ८ लहान कोळंब्या, नूडल्स १ पॅकेट, एक मोठा लाल कांदा, एक टोमॅटो, आले-लसणाची पेस्ट १ चमचा, दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, पाऊण चमचा गरम मसाला, हळद अर्धा चमचा, क्रीम १ चमचा, चिरलेला पुदिना आणि तेल १ चमचा.

कृती : नुडल्सचे तुकडे करून ते उकळून घ्यायचे. त्यानंतर तेल गरम करून त्यात कांदा तांबूस होईपर्यंत तळून घ्या. मग त्यात आले-लसणाची पेस टाकून तीही फ्राय करून घ्या. मग त्यात टोमॅटो घालायचे. मग हिरव्या मिरच्या घालून नीट मिक्स करून घ्यायचे. चवीपुरते मीठ घालायचे. यानंतर त्यात कोळंबी घालून तीही चांगली शिजेपर्यंत तळायची. मग क्रीम घालायचे आणि मिश्रण गॅसवरून खाली उतरवायचे. एका वाटीत उकडलेल्या नुडल्स आणि प्रॉन्स मसाला यांचे थर करायचे. त्यात चिरलेला पुदिना, तळलेला कांदा घालून त्यावर झाकण ठेवायचे. ५ ते १० मिनिटांत ओव्हनमध्ये ही बिर्याणी तयार होईल. मग झालेली बिर्याणी वाढायची.

सफरचंदाची फिरनी

साहित्य : ४ मध्यम आकाराची सफरचंद, अर्धा लिटर दूध, तांदळाची पिठी ५० ग्राम, साखर १०० ठॉम, वेलची पाव चमचा, थोडंसं केशर, देशी तूप २ चमचे.

कृती : सफरचंद वरून कापायचे. हा तुकडा फिरनीचे झाकण म्हणून वापरता येणार आहे. सफरचंद एखाद्या खोलगट कपासारखे आतून कोरून घ्यायचे. त्यातल्या बिया टाकून देऊन गर काढून घ्यायचा. बियाणे आणि कोर भाग काढून टाका आणि गराचे तुकडे करून घ्यायचे. हा गर थंड पाण्यात ठेवायचा. नाहीतर तो काळा पडेल. शक्यतो तो लगेच वापरायचा. नंतर एका पॅनमध्ये तूप मंद आचेवर गरम करून त्यात तांदळाची पिठी टाकायची. त्याला सुवास येईपर्यंत तळून घ्यायची. मग त्यात हळूवारपणे गरम दूध घालून मिश्रण चांगले एकजीव करायचे. त्यानंतर त्यात साखर व वेलची पूड घालून मिश्रण मंद आचेवर शिजू द्यायचे. अर्धा कप गरम दुधात केशर भिजवून ठेवायचे. त्यानंतर ते वरील मिश्रणात मिसळायचे. मग त्यात सफरचंदाचे काप टाकून ५ मिनीटे शिजू द्यावे. फिरनी जाडसर व्हायला पाहिजे. त्यानंतर मिश्रण गॅसवरून खाली उतरवून थंड होऊ द्यायचे. मग ते सफरचंदांच्या बास्केटसारख्या खोलगट भागात काढायचे. ते किमान एक तास तसेच ठेवायचे. त्यात पिस्ता घालून सफरचंदाच्या बास्केटवरील झाकण सर्व्ह करताना काढायचे. अखेरीस फिरनी भरलेली सफरचंदे एखाद्या नव्या क्रिकेट बॉलसारखी दिसतात.

आपली प्रतिक्रिया द्या