
इलॉन मस्क यांची कंपनी स्टारलिंकने हिंदुस्थानात भरती सुरू केली आहे. ही भरती फायनान्स आणि अकाऊंटंट या पदासाठी असून पात्र ठरलेल्या उमेदवारांना बंगळुरूमध्ये काम करावे लागेल. बंगळुरूमध्ये स्टारलिंकचे मुख्य ऑपरेशनल हब बनवले जाणार आहे. कंपनीने पेमेंट्स मॅनेजर, अकाऊंटिंग मॅनेजर, सीनियर ट्रेझरी अॅनालिस्ट आणि टॅक्स मॅनेजर अशा पदांसाठी भरती सुरू केली आहे. या पदासाठी फक्त स्थानिक उमेदवार अर्ज करू शकतात, अशी अट ठेवली आहे.
सरकारी नियमांचे पालन करण्यासाठी कंपनीने सुरक्षा चाचण्या सुरू केल्या आहेत. मुंबईतील कायदा अंमलबजावणी संस्थांना या सेवेचा डेमो देण्यात आला आहे. स्टारलिंकने मुंबई, चेन्नई आणि नोएडा येथे तीन गेटवे स्टेशन स्थापित करण्यासाठी मंजुरी मागितली आहे. कंपनी लॉन्च झाल्यानंतर गेटवे नेटवर्कचा विस्तार 9-10 ठिकाणी करेल. चंदिगड, कोलकाता आणि लखनऊसारख्या शहरांमध्ये नवीन साइट्सची योजना आहे.
मुंबईत ऑफिस
स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्सने मुंबईतील चांदिवली येथील बूमरँग या व्यावसायिक इमारतीच्या तळमजल्यावर 1,294 चौरस फूट जागा भाड्याने घेतली आहे. हा भाडे करार 14 ऑक्टोबरपासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. मासिक भाडे 3.52 लाख आणि दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. यासाठी कंपनीने 31.7 लाखांची सुरक्षा ठेव जमा केली आहे.




























































