लाल रंगाची फॅशन

>>पूजा तावरे – फॅशन डिझायनर<<

बाप्पाचा आवडता लाल रंग फॅशनमध्येही तितकाच लोकप्रिय आहे.

प्रत्येक रंग हा बोलका असतो. प्रत्येक रंगाचं एक वैशिष्टय़ असतं. त्यानुसार तो रंग आपल्या लाईफस्टाईलमध्ये वापरला जात असतो. त्यातूनच त्या रंगाच्या अर्थाची ऊर्जा प्रतीत होते. सिग्नल पाहिला की गाडी थांबते, केकवरची चेरी, नववधूचा पेहराव, प्रपोज करण्यासाठी आणलेला गुलाब, लाडक्या बाप्पाला घातलेला जास्वंदींचा हार या सर्व गोष्टींमध्ये कॉमन गोष्ट म्हणजे लाल रंग. आपण लहान असो वा मोठा, ज्या ज्या वेळी रंग हा विषय नजरेसमोर येतो त्या त्या वेळी सर्वप्रथम लाल रंगाचा प्रामुख्याने विचार येतो. लाल रंग हा भडक मानला जात असला तरी तो प्रेम आणि युद्धाचे प्रतीक आहे. लाल रंग शारीरिक स्थितीचे आणि भावनेचे चढते स्पंदन दाखवितो, मग ती भावना संतापाची असेल वा प्रेमातील बेभानता असेल. फॅशन जगतात लाल रंग हा शोस्टॉपर समजला जातो. लाल रंगाच्या विविध छटांनी फॅशन जगतातील सर्व क्षेत्रांत आपला प्रभाव पाडला आहे. लाल रंगात सजलेल्या मॉडेल्सनी रॅम्पवर मोठय़ा प्रमाणात वर्चस्व गाजवले आहे.

रेडमय बॉलीवूड

अनेक बॉलीवूड अभिनेत्रीदेखील आपल्या फॅशन स्टेटमेंटमध्ये रेड ऍन्ड हॉट असणाऱया लाल रंगाला पसंती देतात. लाल रंगाबद्दलची बॉलीवूडची आवड कायमच राहिली आहे. त्यामध्ये साडीला अधिक प्राधान्य मिळाले आहे. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘दोबारा’ मधल्या सोनाक्षी सिन्हाची लाल साडी, देवदासमधील माधुरी दीक्षितची लाल ऑर्नेट साडी, ‘छम्मक छल्लो…’वर सुंदर अशा लाल साडीवर नाचणारी करिना कपूर, ‘मै हूँ ना’मधील सुश्मिता सेन, ‘माय नेम इज खान’मधील काजोलची रेड-गोल्डन साडी आपल्याला आठवणीत ठेवतात.

आराधनेतही लाल रंग

red-colour

लाल रंग म्हटलं की, आठवतो गणपती बाप्पा. तेजस्वी, क्रांतीचा सूचक असणारा लाल रंग हा गणपती बाप्पाशी निगडित दिसतो. लाल रंगाचे फूल त्याला अधिक प्रिय आहे. पूजा करताना लाल वस्त्र, तांबडे फूल व रक्तचंदन वापरतात. लाल रंगामुळे वातावरणातील गणपतीची पवित्रके मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होतात व मूर्ती जागृत व्हावयास मदत होते. लाल रंगामुळे महत्त्वाकांक्षा आणि निर्धार यासाठी प्रोत्साहन मिळते. तसेच लाल रंग हा एक भावना आणि नेतृत्व गुण यांचे प्रतीक आहे. लाल रंग आपले हेतू मजबूत करण्याकरिता मदत करते. लाल रंगाचे लाजाळूपणा आणि प्रबळ इच्छाशक्ती वाढविण्यास महत्त्वपूर्ण योगदान असते. आत्मविश्वास वाढविण्यासदेखील लाल रंग मदत करतो.

 

आपली प्रतिक्रिया द्या