घर खर्च परवडेना, पती पैसे देईना; पत्नीची पतीला वायपरने मारहाण

612

आधीच ज्यादा झालेला खर्च आणि पत्नी अति खर्च करते म्हणून पैसे देण्यास नकार देणे पतीला चांगलेच महागात पडले आहे. दिल्लीच्या मयूर विहार भागात एका व्यक्तीला पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीने वायपरने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

पतीची ही स्थिती पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. जखमी झालेल्या 40 वर्षीय व्यक्तीला लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारानंतर सोडण्यात आले. या व्यक्तीने दिलेल्यावरून पोलिसांनी पत्नीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मयूर विहार पोलीस ठाण्याकडून पत्नीची चौकशी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती आपल्या कुटुंबीयांसह त्रिलोकपुरीत राहतो. त्यांच्या सोबत पत्नी, 16 आणि 12 वर्षांची दोन मुले आहेत. पीडित व्यक्ती व्यवसाय करतो. लॉकडाऊननंतर व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला असून घराच्या गरजा पूर्ण होत नसल्याने काही दिवसांपासून वादावादीचा प्रकार वाढल्याचे चौकशीत समोर आल्याचे कळते आहे.

सोमवारी पती बाहेरून घरी पोहोचला तेव्हा पत्नीने घरखर्चासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. पैसे नसल्याने कुणाकडून सध्या उधार घे असे पतीने सांगितले तेव्हा पत्नी संतापली. पतीचा बाहेर जाण्याचा रस्ता अडवून आधी पैसे द्या अशी मागणी करू लागली. पतीमात्र आपल्या भूमिकेवर ठाम होता. त्याने तिचा हात बाजूला करून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. पत्नीने जवळच असलेला वाइपर उचलला आणि पतीला जोरजोरात मारण्यास सुरुवात केली. पती जखमी झाला त्याने आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकून शेजारपाजारी आले. मग पतीची कशीबशी सुटका झाली. या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे. दरम्यान, शेजार्‍यांनी त्या व्यक्तीला रुग्णालयात नेले. नंतर पतीने पत्नीविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून घटनेची माहिती घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या