स्वमग्न मुलांचे पुनर्वसन

>>अंबिका टाकळकर

स्वमग्नता किंवा ऑटिझम हा काही रोग नाही. ती जन्मस्थ अवस्था असते. त्यामुळे आपलं मूल आहे तसं स्वीकारून, त्याच्या कलागुणांची पारख करत त्याच्या आनंदी जगण्याचा भार ऑटिस्टिक मुलांचे पालक अगदी आनंदाने वाहत असतात. पण या आनंदाचा भार वाहताना एक बोचरी जाणीव कायम असते ती म्हणजे आपल्या जाण्यानंतर काय? वार्धक्याकडे झुकू लागलेल्या अनेक ऑटिस्टिक मुलांच्या पालकांचा हा अनुत्तरीत प्रश्न सोडवण्यासाठी आरंभ या संस्थेने वसतीगृह उभा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

मराठवाडय़ातील नांदेड जिह्यातील एका छोटय़ाशा तालुक्यातील एक पालक 32 वर्षांच्या ऑटिस्टिक मुलाला घेऊन माझ्याकडे आलेले. ते स्वतः सत्तरीकडे झुकलेले, पत्नी दोन-तीन वर्षांनी लहान, बाकी दुसरी दोन्ही मुले नॉर्मल, त्यांची लग्न होऊन मुलगा बंगळुरूला तर मुलगी अमेरिकेत सेटल झालेली. वार्धक्याकडे झुकलेले हे जोडपे 32 वर्षांच्या मुलाला घेऊन राहतात. कुठेही जायचे असले की ते त्याला घेऊन जातात. सर्व परिस्थिती ऐकल्यानंतर त्यांना मी विचारले ‘मग पुढे काय? तुमच्यानंतर या मुलाचे काय?’ हा प्रश्न ऐकून दोघही थबकले. ‘खरे तर त्यांची घालमेल तीच, पण ते उच्चारायला घाबरत होते इतकेच.’ नाशिक येथील एक पालक आले होते. त्यांचा दहा वर्षांच्या मुलगा अतिशय अतिचंचल. त्यांच्या मुलासाठी ते एका गतिमंद मुलांसाठी असलेल्या निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेले होते, पण मुलाला पाहताच त्यांनी त्याला ठेवून घेण्यास नकार दिला.
अजून एका पुण्याच्या निवासी संस्थेमध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की स्वमग्न मुलांसाठी निवासी सोय देऊ शकत नाही.

अजून एक मुलगा, त्याच्या वयाच्या 45 व्या वर्षी त्याची आई सोडून गेली आणि वडिलांचे वय 75 वर्षे. मुलाला कसे सांभाळायचे ते वडिलांना माहितीच नव्हते. कारण त्या मुलाचे सगळे त्याची आईच करत असे. शेवटी त्याच्या बहिणीने त्याला एका गतिमंद मुलांच्या संस्थेमध्ये कसा तरी प्रवेश मिळवून दिला. दिव्यांग मुलांच्या पालकांनी काही गोष्टींचा विचार आधीच केला पाहिजे. काय ते आपण पाहुया. सगळ्यात आधी तर काही गैरसमज पालकांनी मनातून काढून टाकूया. दिव्यांग मुलांची काळजी पालक ज्या चांगल्या प्रकारे घेऊ शकतो तितकी दुसरे कुणीच घेऊ शकत नाही हे खरे असले तरी 18 वर्षांनंतर आपल्या पाल्याला थोडंथोडं एकटे राहायला शिकवले पाहिजे. हॉस्टेलची सवयही मुलांना लावली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं की आई- बाबांपैकी एकजण आधी जातो. मागे उरलेला त्या पाल्याची जबाबदारी निभावत असतो व अचानक एक दिवस तोही सोडून जातो. मग दिव्यांग मुल एकटंच उरतं. अन् अचानकपणे त्याची सोय कुठ करायची? हा प्रश्न नातेवाईकांसमोर उभा राहतो. प्रत्येकाला प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या असतात. मग त्या मुलासाठी कुठलं तरी हॉस्टेल शोधल जातं. त्याला तिथे राहण्याची जबरदस्ती केली जाते. ज्याला वयाची 35-40 वर्षे एका प्रकारच्या वातावरणाची सवय झालेली असते. ते एका दिवसात नवीन जागा, नवीन लोकं, नवीन वातावरण, नवीन नियम कसे स्वीकारेल, शक्यच नाही. त्यामुळे मूल 18 वर्षांचे झाले की त्याला थोडी थोडी सवय लावली पाहिजे. अधूनमधून आधी काही दिवसांकरिता. नंतर हळूहळू पूर्णपणे त्यांना त्या वातावरणाची सवय हवी. यात अनेक चांगल्या बाजूपण आहेत. मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये राहता येतं. त्यांना त्यांचे आयुष्य जगता येते. त्यांना शिस्त लागते. त्यांना स्वतंत्र्य कसे जगायचे याचे शिक्षण मिळते ते वेगळेच.

स्वमग्न मुलांना वाढवताना पालकांना त्यांचा संपूर्ण वेळ द्यावा लागतो. त्यांच्या अवतीभवती राहूनच त्याच्याकडे लक्ष द्यावे लागते. आपलं करीअर ऐन जोमात असताना ऑटिस्टिक मुलाची जबाबदारी घेण्यासाठी दोघांपैकी एक करीअर सोडून देतो. मात्र आमच्या आरंभ सारख्या संस्थांमुळे अशा पालकांना त्यांचं आयुष्य जगण्यासाठी मोकळा वेळ मिळतोय ही अमच्यासाठीही तितकीच मोलाची गोष्ट आहे. सतत मुलांजवळ राहिल्याने येणारा मानसिक ताण कमी झाला आहे. याबरोबरच अशा समविचार पालकांचे समूह करत त्यांच्यासाठीही उपक्रम आखल्याने त्यांच्या भावनांना मोकळीक मिळते, त्यांचे विचार, समस्या जाणून घेता येतात. त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं आयुष्य सुखावह, अर्थपूर्ण होईल यासाठी आरंभ सर्वतोपरी मदत करतं. दिव्यांग आणि विशेषत: ऑटिस्टिक मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या अशा समस्या जाणून घेताना या मुलांसाठी वसतीगृह असणं किती आवश्यक आहे हे लक्षात आलं. या मुलांच्या पालकांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी वसतीगृह उभा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

आरंभ ही संस्था गेली दहा वर्षे ऑटिस्टिक मुलांसाठी थेरपी, शिक्षण, विशेष शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण असे काम करते. प्रत्येक दिव्यांग मुलाच्या पालकांना सतावणारा, भंडावून सोडणारा प्रश्न म्हणजे ‘आमच्यानंतर आमच्या मुलाचं काय?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आरंभ संस्था स्वमग्न व गतिमंद मुलांची संस्था करणार आहे. त्याचसाठी संस्थेने संभाजीनगर शहरालगत दोन एकर जागा घेऊन तिथे स्वमग्न मुलांसाठी निवासी वसतिगृह करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. स्वमग्न व गतिमंद मुलं/व्यक्ती ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते. तेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या पाल्यासाठी हक्काचे, प्रेमाचे, सुरक्षित व संयमित व सधन दुसरे घर तयार करावयास हवे.

शेवटी काय तर माणुसकी अजूनही जिवंत आहे. म्हणून तर तुमच्या-माझ्यासारखे सकारात्मक विचार करू शकतात. आता खरी गरज आहे आरंभला आपल्या सगळ्यांच्या मदतीची. आपली अवघी छोटीशी मदत स्वमग्न व गतिमंद मुलांच्या आयुष्यात सावरण्यास उपयोगी ठरेल.

(लेखिका आरंभ या स्वमग्न व गतिमंद मुलांच्या संस्थेच्या संचालक आहेत.)
n [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या