स्टॅण्डिंग वॉरंटविरोधातील बोठेंचा अर्ज फेटाळला, जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासा नाहीच

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे याच्याविरोधात पारनेर येथील न्यायालयाने स्टॅण्डिंग वॉरंट काढले आहे. त्याविरोधात बोठे याने जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अर्ज येथील जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी फेटाळून लावला आहे. त्यामुळे बाळ बोठे याच्याविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर सुपे येथील घाटात धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी हा गुन्हा बोठे याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली आहे. या हत्याकांडात नाव आल्यापासून आरोपी बोठे हा पसार झालेला आहे. बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात स्टॅण्डिंग वॉरंट काढण्यासाठी पारनेर येथील न्यायालयात अर्ज केला होता. त्याच्यावर सुनावणी होऊन पोलिसांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. त्यानुसार आता पुढील प्रक्रियेत बोठे याला फरार घोषित करण्यात येऊ शकते. याची कल्पना आल्याने बोठे याने स्टॅण्डिंग वॉरंट ऑर्डरच्या विरोधात जिल्हा न्यायालयात आव्हान अर्ज दाखल केला होता.

बाळ बोठेच्या अर्जावर 18 रोजी सुनावणी घेण्यात आली होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी ठेवण्याचे आदेश दिले होते. सरकारी वकिलांनी यावेळी न्यायालयासमोर पोलिसांचे म्हणणे लेखी स्वरूपात मांडले. त्यानुसार जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी हा अर्ज फेटाळून लावला आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ढगे यांनी काम पाहिले.

दरम्यान, स्टॅण्डिंग वॉरंटच्या विरोधात दाखल अर्ज फेटाळल्यानंतर आता त्याच्या संपत्तीवर टाच आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलीस प्रशासनाने त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे. संपत्तीवर टाच आणण्यासह त्याची विक्री करण्याची परवानगी मागण्यात येणार आहे.

अटक आरोपींविरोधात चार दिवसांत दोषारोपपत्र

जरे हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आजवर पाच आरोपींना अटक केलेली आहे. त्यांच्या विरोधात येत्या चार दिवसांत दोषारोप पत्र दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले आहे.

आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा जरे कुटुंबीयांचा आरोप

रेखा जरे हत्या प्रकरणात पोलिसांनी पकडलेल्या आरोपींना पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा रेखा जरे यांचा मुलगा कुणाल जरे याने केला आहे. यासंदर्भात त्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. या निवेदनात कुणाल जरे यांनी म्हटले आहे की, रेखा जरे खून प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याबाबत खात्रीलायक लोकांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे याची योग्य चौकशी व्हावी व सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी व्हावी, दोषी लोकांवर कारवाई करावी. सर्व आरोपींना पारनेर येथील न्यायालयीन कोठडीत न ठेवता त्यांना नगर अथवा नाशिक कारागृहात वर्ग करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या