रेखा जरे हत्या प्रकरण- रूणाल जरे यांचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडप्रकरणात पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी जरे यांचा मुलगा रूणाल व त्यांची आई सिंधुबाई वायकर यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला नगर-पुणे रस्त्यावर जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर उर्ङ्ग गुड्डू शिवाजी शिंदे, फिरोज राजू शेख, आदित्य सुधाकर चोळके, सागर भिंगारदिवे, ऋषिकेश पवार या पाच आरोपींना अटक केलेली आहे. त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. बोठे हा शोधूनही सापडलेला नाही. जरे यांची हत्या होऊन 90 दिवस उलटून गेलेले आहेत. बोठेचा पोलिसांना तपास लागत नसल्याच्या निषेधार्थ रूणाल जरे यांनी उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणासंदर्भात त्यांनी आठ दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार जरे यांच्या आई सिंधुबाई वायकर व मुलगा रुणाल जरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, बोठे याला पारनेर न्यायालयाने गुरूवारी (दि.4) फरार घोषित केले आहे. न्यायालयाने 9 एप्रिलपर्यंत त्याला स्वत:हून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. तो हजर राहिला नाही तर पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे.

जाहीरनामा बोठेच्या घराला डकविला

बोठे याला फरार घोषित केल्यानंतर गुरूवारी सायंकाळी पोलिसांनी त्याच्या विरोधात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 82 नुसार जाहीरनामा प्रसिध्द केला. सुपा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात बोठे आरोपी असून तो मिळून येत नसून अटक टाळत आहे. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले असून त्याने न्यायालयासमोर 9 एप्रिलपर्यंत हजर व्हावे असे त्यात म्हटले आहे. दरम्यान, हा जाहीरनामा बोठे याच्या घराला डकविण्यात आल्याची माहिती तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली. चल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सुद्धा लावला आहे

या आहेत मागण्या

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार बाळ बोठे याला तात्काळ अटक करा, बोठेच्या मालमत्तेची चौकशी करून अवैध मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल करा, बोठे फरार होण्याच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा आणि बोठेला फरार होण्यास सहकार्य करणार्‍यांवर कारवाई करून त्यांना जरे हत्याकांडात सहआरोपी करा या मागण्या रूणाल जरे यांनी केल्या आहेत.

रूणाल जरे यांचे उषोषण सुरू

रेखा जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांनी हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे सापडत नसल्याने आमरण उषोषणास सुरूवात केली. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर रूणाल जरे, रेखा जरे यांच्या आई सिंधू वायकर व नगर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते गोरख आढाव यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजल्यापासून उषोषणास सुरूवात केली आहे.

जिल्ह्यातील नेते अधिवेशनात गप्प का?

रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर तपासात या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे असल्याचे समोर आले. बाळ बोठे हा अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. जिल्ह्यातील काही नेते हिवाळी अधिवेशनात पूजा चव्हाण प्रकरणावर बोलतात. मग ‘ते’ नेते जिल्ह्यातील रेखा जरे हत्या प्रकरणाबाबत गप्प का आहेत, असा सवाल उपोषणास बसल्यानंतर रूणाल जरे यांनी उपस्थित केला आहे.

बाळ बोठे याला अटक करा; तृप्ती देसाईंची मागणी

नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला अटक करा, या मागणीसाठी रेखा जरे यांच्या मुलाच्या उपोषणाला भूमाता ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दिला आहे.

तसेच बाळ बोठेला अटक करा, त्याच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश द्या, आणि त्याला सहकार्य करणाऱ्या लोकांना अटक करा अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या