कमल हासनने जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा रेखाचा आरोप, माफी मागण्याची चाहत्यांची मागणी

5430

अभिनेत्री रेखाने तिच्यासोबत भूतकाळात घडलेला एक कटू प्रसंग मुलाखतीमध्ये सांगितला आहे. या मुलाखतीमध्ये तिने कमल हासन याने एका चित्रपटात आपले जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा आपण त्या वेळी विरोध केला होता मात्र आपलं तेव्हा कोणीच ऐकलं नाही असं रेखा हिने म्हटले आहे.

घडलेला प्रसंग हा 1986 सालचा असून पुन्नागई मन्नान चित्रपटातील आहे. के बालचंदर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. या चित्रपटामध्ये कमल हासन आणि रेखा हे दोघेजण आत्महत्या करायला धबधब्यावर जातात आणि उडी मारण्यापूर्वी कमल हासन रेखाचे करकचून चुंबन घेतो असं दाखवण्यात आलं आहे. या चुंबन दृश्याबद्दल आपण सोडून इतरांना माहिती होती असं रेखाने म्हटलं आहे.

रेखाला विचारण्यात आलं की या प्रसंगाबाबत तुझी कोणी माफी मागितली का ? यावर तिने म्हटले की माफी कोणी का मागणार ? चित्रपट सुपरहिट झाला होता आणि मला त्यानंतर अनेक भूमिका मिळाल्या. मात्र आजपर्यंत माझी कोणीही माफी मागितली नाही. सत्य हेच आहे की मी या चुंबनदृश्यासाठी होकार दिला नव्हता आणि हा प्रसंग अचानक घडला. मी हे दृश्य पुन्हा कधीही बघू इच्छत नाही.

या चित्रपटाचे शूटींग ज्यावेळी होते तेव्हा रेखा 16 वर्षांची होती. 30 वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रसंगाबाबत रेखा हिने पुनरुच्चार केल्यानंतर कमल हासन यांनी या चुंबन दृश्यासाठी रेखाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. बालचंदर यांचा 2014 साली मृत्यू झाला आहे. त्यामुळे माफीची मागणी ही प्रामुख्याने कमल हासन यांच्याकडेच केली जात आहे.

कमल हासन हा त्याच्या आगामी हिंदुस्थानी-2 चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो रजनीकांतसोबतही एका चित्रपटात काम करणार आहे. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गिरफ्तार’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. तेव्हापासून चाहते या दोन मेगास्टार अभिनेत्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर 35 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कानगराज यांच्या आगामी चित्रपटात रजनीकांत व कमल हासन पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.

लोकेश कानगराज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या आगामी चित्रपटाची घोषणा केली, मात्र त्यांनी या चित्रपटाचे नाव, कथानक किंका रजनीकांत व कमल हासन यांच्या भूमिकांबाबत कुठल्याही स्करूपाची माहिती दिली नाही. ‘मी रजनीकांत व कमल यांना चित्रपटाचे कथानक वाचायला पाठवले होते. दोघांनाही कथानक खूप आवडले आहे असे त्यांनी सांगितले. 35 वर्षांनंतर दोघे एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहेत. येत्या काळात मी चित्रपटाची अधिकृत घोषणा करेन’ असे लोकेश कानगराज म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या