पाच हजार कोविड मृतांचे नातेवाईक मदतीपासून वंचित

मृत्यू प्रमाणपत्रावरील मृत्यूच्या कारणामध्ये कोविडचा उल्लेख नसणे, संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड व रेशनकार्डवरील नावात असमानता असणे आदी तांत्रिक कारणास्तव ही प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगण्यात येते.

कोविड महामारीमध्ये हजारो नागरिक दगावले. प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 50 हजार रुपये मदत देण्याचे राज्य शासनाने निश्चित केले होते, परंतु कोविड संपून आज बरेच महिने लोटले तरी अद्याप पाच हजार मृतांचे नातेवाईक या मदतीपासून वंचित आहेत. स्वतः शासनानेच हा आकडा दिला आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या बैठकीत राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा खर्च, कोकण आपत्ती सौम्यीकरण कामे, कोविड व विविध प्रसंगी करण्यात आलेल्या बचाव कार्याचा खर्च, ई-पंचनामे, आपदा मित्र, ई-सचेत प्रणाली आदी मुद्दय़ांवर मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी सादरीकरण केले.

कोविडसंदर्भातील कारणांसाठी आजपर्यंत 1 हजार 974 कोटी खर्च झाला असल्याची माहिती या सादरीकरणावेळी गुप्ता यांनी दिली. कोविड काळात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना मदत व पुनर्वसन विभागाने मदत वाटप केले. त्यासाठी 1038 कोटी रुपये खर्च झाला. आजही त्यातील पाच हजार प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती गुप्ता यांनी बैठकीत दिली.

  मृत्यू प्रमाणपत्रावरील मृत्यूच्या कारणामध्ये कोविडचा उल्लेख नसणे, संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड व रेशनकार्डवरील नावात असमानता असणे आदी तांत्रिक कारणास्तव ही प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगण्यात येते. मात्र ती निकालात काढण्यासाठी शासनाने काहीच निर्णय घेतला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.