लातूरात अपहरण केलेल्या 13 तरुणींची व आठ बालकामगारांची मुक्तता

लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या अपहरणच्या 13 गुन्ह्यांची उकल करून राज्यातील विविध जिल्ह्यात तपास करून एकूण 13 अल्पवयीन मुलींचा शोध घेत त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. लातूर पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची नुकतीच स्थापना केली आहे. याद्वारे बेकायदेशीरपणे महिला, तरुणींना चुकीचे काम करायला लावणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना प्रतिबंध करण्यात येत आहे.

या कक्षाच्या पथकाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात कक्षाचे प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांच्या टीमने सायबर सेलच्या मदतीने, लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या अपहरणच्या 13 गुन्ह्यांची उकल करून राज्यातील विविध जिल्ह्यातून एकूण 13 अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच अनैतिक व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या 6 तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे.

अनेकदा इतर राज्यातून किंवा दुसऱ्या देशातून तरुण मुलींना पळवून आणले जाते व त्यांना शरीरविक्रीच्या धंद्यात ढकलले जाते. तर अनेकदा तरुण मुलींचे अपहरण करून त्यांना इतर भागात पाठविले जाते. बनावट पासपोर्ट, कागदपत्र बनवून महिला किंवा पुरुषांना बेकायदेशीर रित्या कामाला लावणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी लातूर पोलिसांनी “अँटी ह्यूमन ट्राफिकिंग कक्ष” स्थापन केला आहे. या पथकात महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी महिला पोलीस अंमलदार वंगे, लता गिरी, पोलीस अंमलदार प्रकाश जाधव, सदानंद योगी, निहाल मणियार हे कार्यरत आहेत.