कर्नाटकातील एका महिलेने येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून खुनाच्या आरोपाखाली कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या पतीला पॅरोलवर सोडण्याची मागणी केली आहे. या महिलेचे म्हणणे आहे की, तिच्या सासूबाई आजारी असतात. त्यांची नातवंडे खेळवण्याची इच्छा आहे. त्यामुळे मूल जन्माला घालण्यासाठी पतीला सोडण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
न्यायालयानेही या महिलेची मागणी मान्य करीत तिच्या पतीला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. या आरोपीला न्यायालयाने वर्ष 2019 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या आरोपीच्या पत्नीने कर्नाटक न्यायालयात याचिका दाखल करून मूल जन्माला घालण्याची इच्छा व्यक्त कली होती. न्यायालयाने याचिकेवर निर्णय देत आरोपीला 5 जून ते 4 जुलैपर्यंत पॅरोल मंजूर केला आहे. पत्नीने याचिकेत म्हटले होते की, पती कारागृहात शिक्षा भोगत असल्याने मी मूल जन्माला घालण्याच्या अधिकारापासून वंचित आहे. ही महिला सासूसोबत राहते.