नादस्मृती उलगडताना…अविनाश ओक यांच्या पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन

बॉलीवूडमधील प्रसिद्ध साऊंड इंजिनीअर अविनाश ओक लिखित ‘अनस्पुलिंग मेमरीज’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच प्रसिद्ध कवी-गीतकार लेखक गुलजार यांच्या हस्ते करण्यात आले, तर या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘नादस्मृती उलगडताना’ या नावाने हे प्रकाशित झाला असून त्याचे प्रकाशन ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले आहे. श्रीपाद सहस्त्र्ाबुद्धे यांनी मराठीत अनुवाद केला आहे.

ध्वनी आणि संगीतातील आपली मुशाफिरी त्यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडली आहे. कलाकार, गायक, वादक, संगीतकार, निवेदक, दिग्दर्शक, गीतकारांच्या अनेक आठवणी, अनेक प्रसंग त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत. पुस्तक प्रकाशन सोहळय़ाला संगीतकार, दिग्दर्शक विशाल भारद्वाज, गायिका रेखा भारद्वाज आणि हेडविग मीडिया हाऊसचे चिन्मय पंडित उपस्थित होते.

 अविनाश ओक यांनी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, पुणे येथून साऊंड इंजिनीअरिंगचे धडे गिरवले आहेत. 1973 साली ते सुवर्णपदक मिळवून उत्तीर्ण झाले. पुढे ध्वनिमुद्रण क्षेत्रातील आपल्या असामान्य कौशल्याने त्यांनी ‘कुछ कुछ होता है’, ‘सरफरोश’, ‘माचीस’, ‘गदर’ यांसारख्या हिंदी तसेच ‘आक्रीत’, ‘कळत नकळत’, ‘चौकट राजा’ अशा मराठी चित्रपटांसह गानसरस्वती किशोरी आमोणकर, पंडित भीमसेन जोशी यांच्या क्लासिक अल्बमसाठी साऊंड इंजिनीअर म्हणून काम केले. 30 वर्षांहून अधिक काळ त्यांनी वेस्टर्न आऊटडोअर स्टुडिओमध्ये काम केले आहे. सध्या ते विविध इन्स्टिटय़ूटमध्ये साऊंड इंजिनीअरिंगचे धडे देत आहेत.