फेसबुकनंतर गुगल करणार रिलायन्स जिओमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक, 7.7 टक्के भागीदारी खरेदी करणार

432

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी हिंदुस्थानमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केल्यानंतर आता गुगलने याकडे पहिले पाऊल टाकले आहे. गुगल रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 7.7 टक्के भागीदारीसाठी 33 हजार 737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. दरम्यान, नीता अंबानी यांनी पहिल्यांदाच वार्षिक सर्वसाधारण सभेत संबोधित केले.

रिलायन्स जिओमध्ये गेल्या काही दिवसात अनेक कंपन्या मोठी गुंतवणूक करत आहेत. याआधी 13 कंपन्यांनी जिओमध्ये गुंतवणूक केली असून गुगल 14 वी कंपनी आहे. याआधी फेसबुकने 43 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. एप्रिलपासून जिओची भागीदारी विकून रिलायन्सने 2.04 कोटी रुपयांचे भांडवल उभे केले आहे.

गेल्या 13 आठवड्यात जिओमध्ये 13 कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. 22 एप्रिलला जिओने घोषणा केल्यानंतर सर्वात आधी फेसबुकने 43 हजार कोटींची गुंतवणूक केली. यानंतर सिल्वर लेक, विस्टा इक्विटी, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबाडला, अबू धाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटी (एडीएआई), टीपीजी, एल कॅटरटन, पीआयएफ आणि इंटेल यांनीही गुंतवणूक केली आहे.

गुगल करणार 75 हजार कोटींची गुंतवणूक
याआधी गुगलने सोमवारी हिंदुस्थानमध्ये 75 हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले होते. इक्विटी इनवेस्टमेंट, पार्टनरशिप आणि ऑपरेशनल इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे ही गुंतवणूक केली जाईल. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या