चंद्रपुरात गावांच्या पुनर्वसन प्रक्रियेत घोळ, शिवसेना आक्रमक

69

सामना ऑनलाईन, चंद्रपूर

चंद्रपूर शहरालगत असलेल्या सिनाळा, नवेगाव, मसाळा या गावांच्या पुनर्वसन प्रक्रियेत घोळ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेने या प्रश्नी आवाज उठवण्याचे ठरवले असून ग्रामस्थांची फसवूणूक सहन केली जाणार नाही असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी दिला आहे. सिनाळा, नवेगाव, मसाळा गावातील नागरिकांना शक्तीनगर इथे स्थलांतरीत केले जाणार असून त्यांना पुनर्वसित करण्यासाठी प्लॉट वाटप करण्यात येणार आहे. या सगळ्या प्रक्रियेत घोळ घातला असल्याची शंका वारंवार उपस्थित करण्यात आली आहे.

चंद्रपूर शहरालगतच्या तीन गावांचे पुनर्वसन 1 ऑगस्ट पासून होणार आहे. मात्र घरांच्या मूल्यांकनात तफावत दिसत असून  ज्यांची पक्की घरे आहेत त्यांना कमी दर दिला जात असल्याचं दिसून येत आहे. अर्धवट,कच्च्या घरांना जास्त भाव दिला जात असल्याचं या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शासनाच्या भूमी अभिलेख सर्व्हेमध्ये नावे आहेत मात्र अजूनही कुणाला भूखंड दिला गेला नाही अशी माहिती संदीप गिऱ्हे यांनी दिली आहे. पती पत्नीच्या नावे दोन घरे असतील तर एकाला भूखंड तर दुसऱ्याला मोबदला देण्यात यावा अशी मागणी गिऱ्हे यांनी केली आहे.

गावातील सरपंच, पुनर्वसन समिती अध्यक्ष व उपसरपंच यांनी संगनमत करून आपापल्या जवळच्या व्यक्तींच्या घराचे दर वाढवून दिल्याचा आरोप होत आहे. या प्रक्रियेवर शंकेचे ढग दाटून आले असून सगळ्या शंका दूर होईपर्यंत ग्रामस्थांचा विरोध कायम राहील आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे असं गिऱ्हे यांनी सांगितले आहे. गावकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर शिवसेना ही प्रक्रिया कोणत्याही परिस्थिती मध्ये होऊ देणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या