पीएमओवर अवलंबून राहणे Useless, कोरोनाविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व गडकरींकडे सोपवा; स्वामींचा सल्ला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात मोठी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटलंय की कोरोनाविरूद्धच्या लढाचे नेतृत्व नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात यावे. स्वामी यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी म्हटलंय की कोरोनाची तिसरी लाट येणार असून त्याचा धोका लहान मुलांना अधिक असणार आहे. अशा परिस्थितीत कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

स्वामी यांनी त्यांच्या या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालय हे Useless म्हणजेच काहीही उपयोगाचे नसल्याचं म्हटत टीकाही केली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणं योग्य नसून या लढाईची सूत्री गडकरींना द्यावीत असं स्वामींचे म्हणणे आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या अपुरी रुग्णालये, ऑक्सिजन, औषधे यामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले खडे बोल

सर्वोच्च न्यायालयानेही देशातील परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. देशभरात सुरू असलेला कोरोनाचा कहर, उपचाराअभावी होत असलेले रुग्णांचे मृत्यू ही विदारक परिस्थिती पाहून सर्वोच्च न्यायालयाने ही तर राष्ट्रीय आणीबाणी आहे अशा स्पष्ट शब्दांत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला खडेबोल सुनावले.

ऑक्सिजन पुरवठा, अत्यावश्यक औषधे, लसीकरण या मुद्दय़ांवर केंद्र सरकारचे राष्ट्रीय धोरण पाहिजे याची आठवण करून देतानाच न्यायालयाने सरकारला नोटीस बजावली होती. कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर बनत चालली असून, रोज तीन लाखांवर नवीन लोकांना संसर्ग होत असून, दोन हजारांवर दररोज मृत्यू होत आहेत. या भयंकर स्थितीची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून (स्यु-मोटो) दखल घेतली आहे.

कडकडीत लॉकडाऊनची गरज-डॉ. रणदीप गुलेरिया

देशात कोरोना आताप्रमाणेच हातपाय पसरत गेला तर विषाणूची तिसरी लाट येऊ शकते. संसर्गाची ही साखळी वेळीच तोडण्यासाठी देशभर किमान दोन आठवडय़ांचा कडकडीत लॉकडाऊनच लागू करण्याची गरज आहे. संसर्ग रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू, विकेण्ड लॉकडाऊन काहीएक कामाचा नाही, असा सावधानतेचा इशारा राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.

डॉ. गुलेरिया यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या वेळी त्यांनी देशातील कोरोनाचा कहर आटोक्यात आणण्यासाठी सरकारला काही महत्त्वाच्या सूचना केल्या. कोरोना आताप्रमाणेच हातपाय पसरत राहिला आणि नव्या स्ट्रेनची तीव्रता वाढली तर देशाला विषाणूच्या तिसऱया लाटेचा धोका आहे. मात्र जर आपण मोठय़ा प्रमाणावर लोकांचे लसीकरण केले तर तिसरी लाट सध्याच्या दुसऱया लाटेइतकी धोकादायक नसेल, असे डॉ. गुलेरिया म्हणाले. काही राज्यांनी नाईट कर्फ्यू आणि विकेण्ड लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र हे उपाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपयोगी पडणारे नाही. देशात किमान दोन आठवडय़ांचा कडक लॉकडाऊनच गरजेचा आहे. रुग्णसंख्या लवकर घटली, तर लॉकडाऊन निर्धारित वेळेआधीही उठवला जाऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

ब्रिटनसारखा लॉकडाऊन लागू करावा लागेल

देशात ब्रिटनसारखा लॉकडाऊन करावा लागेल. मग तो राज्यांच्या पातळीवर असू द्या किंवा राष्ट्रीय पातळीवर. हा निर्णय धोरणकर्त्यांचा असेल. कारण लोकांचे जीवन, उदरनिर्वाह अशा सर्व बाबींचा विचार करून ठरवावे लागेल. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवाव्या लागतील, दररोज मजुरी करून पोट भरणाऱयांचाही विचार करावा लागेल. परंतु, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन कडकच असायला हवा, असा पुनरुच्चार डॉ. गुलेरिया यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या