छावणीला नव्हे, दावणीला मदत : राज्यमंत्री खोतकर

37

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे, परिणामी पिण्याचे पाणी, चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी पुढे आली आहे, मात्र, मागील चारा छावण्याचा अनुभव वाईट असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याऐवजी शेतकऱ्यांना थेट मदत म्हणून दावणीलाच मदत केली जाणार आहे, असे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बिझनेस महाएक्स्पो-२०१८ कार्यक्रमासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आज गुरुवारी शहरात आले होते, त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ पाहणीच्या दिलेल्या आदेशाप्रमाणे आपण जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील पीक-पाणी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. हे स्पष्ट करून खोतकर पुढे म्हणाले, मराठवाडा विभागाची परिस्थिती कठीण आहे, अत्यल्प पावसामुळे खरीप पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागू शकलेले नाही, पाऊस नसल्याने रब्बी पिकांची पेरणीही होऊ शकलेली नाही, दोन्ही पिके शेकऱ्यांच्या हातू लागू शकलेले नाही, हे आजपर्यंतच्या आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत आहे.

खरीप किंवा रब्बी यापैकी एक तरी पीक शेतकऱ्यांच्या हाती लागत असे, मात्र, परिस्थिती खूपच कठीण आहे. १९७२ च्या दुष्काळापेक्षाही स्थिती नाजूक आहे. पिण्यासाठी पाणी आणि जनावरांसाठी उपलब्ध नाही. मुकी जनावरे जगविणे कठीण आहे. त्यामुळेच चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. पण छावण्यांऐवजी शेतकऱ्यांच्या दावणीला मदत करण्याची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाईल. चारा कमी पडू लागला तर परराज्यातून, वेळप्रसंगी परदेशातून चारा उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी डेपो उभारले जातील, असेही ते म्हणाले.
दुष्काळाचा समाना करण्यासाठी सरकारकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी चारा, मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोहयोच्या कामांना प्राधान्य आणि मागेल त्याला काम उपलब्ध करून दिले जाणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असेही खोतकर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या