निर्मलाताई आठवले- एक ध्यासपर्व

716

अॅड.प्रतीक राजुरकर

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले अर्थात दादा यांच्या धर्मपत्नी निर्मलाताई यांचे नुकतेच ठाणे येथे निधन झाले. पांडुरंगशास्त्रीजींचा ‘स्वाध्याय परिवार’ आज जगभरात आहे. व्यक्तिपरिवर्तनातून समाजपरिवर्तनासाठी उभारलेल्या शास्त्रीजींच्या विविध संस्था आणि कार्य आज देश-विदेशात सर्वदूर पसरलेले आहे. ज्याची नोंद ‘रेमन मॅगसेसे’, ‘टेम्पलटन’, ‘पद्मविभूषण’सारख्या अनेक पुरस्कारांद्वारे विश्वात घेतली गेली आहे. अशा एका कृतिशील तत्त्वचिंतकाचा संसार चालवणाऱ्या निर्मलाताई यांचा जन्म ३ ऑगस्ट १९२६ ला रत्नागिरीमधल्या गावखडीमध्ये सिधये कुटुंबात झाला. १९४४ साली पांडुरंगशास्त्रींशी विवाह झाला तेव्हापासून त्या शास्त्रीजींच्या सर्व कार्यांमध्ये खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी बनल्या. दादांचे वडील वैजनाथशास्त्रींनी स्थापन केलेली मुंबईतली श्रीमद्भगवदगीता पाठशाळा म्हणजे पांडुरंगशास्त्रींचे कर्मक्षेत्र. शास्त्रीजींनी पुढे ठाण्यामध्ये तत्त्वज्ञान विद्यापीठ उभे केले तेव्हा तर तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी निर्मलाताई अहोरात्र झिजल्या. मुलांच्या जेवणाखाण्यापासून सर्व गोष्टी निर्मलाताईंनी स्वतः उभ्या राहून केल्या. अगदी लहानसान गोष्टींमधूनदेखील त्यांनी मुलांना आयुष्यभर पुरेल असा संस्कारांचा वारसा निरलसपणे दिला.

अत्यंत बुद्धिमान असूनदेखील शास्त्रीजींच्या व्यक्तित्वात आणि कार्यात त्या अगदी अंतःस्थ सरस्वतीच्या प्रवाहाप्रमाणे वाहत राहिल्या. निर्मलाताई स्वाध्याय परिवाराच्या सर्व रचनात्मक कार्यांमध्ये भक्कमपणे शास्त्रीजींच्या पाठीशी उभ्या राहिल्या. शास्त्रीजींसुद्धा आपल्या कार्याबद्दल निर्मलाताईंचा सल्ला महत्त्वाचा मानत असत. हे दांपत्य हिंदुस्थानातल्या अगदी दूरदूरच्या खेडोपाडय़ात, कोणत्याही सोयीसुविधांची अपेक्षा न धरता फिरले आणि हजारो लोकांना त्यांनी आपलसे केले. तरीही स्वतःचे निराळेपण कधी दाखवून न देता निर्मलाताईंनी शास्त्रीजींच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वामध्ये स्वतः विरघळून जाणे जास्त पसंत केले. मुंबईत सुरू झालेले शास्त्रीजींचे कार्य जसजसे सर्वदूर पसरू लागले तसा समग्र स्वाध्याय परिवार निर्मलाताईंचेसुद्धा एक व्यापक कुटुंब बनले. प्रत्येकाच्या सुखदुःखात त्या सहभागी असायच्या. आपल्या कार्याच्या निमित्ताने गावखेडय़ात शास्त्रीजी लोकांना भेटत असत तेव्हा सोबत असलेल्या निर्मलाताई तिथल्या भगिनींशी अगदी सहज गप्पागोष्टी करता करतासुद्धा नकळत खूप काही शिकवून जात. गावातल्या घराघरात त्यांचा वावर असायचा. त्यामुळे स्वच्छता, नीटनेटकेपणा, शिस्त, समयसूचकता यांचा आदर्श भगिनींना पाहायला मिळत असे. शास्त्रीजींना भेटायला येणाऱयांच्या घरची ख्यालीखुशाली जाणून घेतल्याशिवाय निर्मलाताईंची भेट पूर्ण होत नसे. घरच्या सर्व जबाबदाऱया सांभाळून विविध विषयांबद्दलचे त्यांचे वाचनसुद्धा सातत्याने सुरू असायचे.

शास्त्रीजींच्या तत्त्वनिष्ठेला निर्मलाताईंची सोबत असल्यामुळे शास्त्रीजी आपल्या कार्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत फिरू शकले. ज्या काळात संपर्क साधनांची वानवा होती तेव्हासुद्धा शास्त्रीजी एकटय़ाने कच्छच्या रणामधून, उत्तराखंडच्या पर्वतरांगांमधून फिरले. आपली कन्या धनश्री तळवलकर (दीदी) यांच्या जडणघडणीमध्ये निर्मलाताईंचे अनन्यसाधारण योगदान आहे. आज वैश्विक स्तरावर पसरलेल्या स्वाध्याय कार्याचा भार वाहण्याचे जे सामर्थ्य धनश्रीदीदींच्या अंगी आहे त्यामागे शास्त्रीजींच्या प्रमाणे निर्मलाताईंचेही संस्कार बहुमूल्य आहेत. शास्त्रीजींच्या निधनानंतर निर्मलाताई ठाणे इथल्या तत्त्वज्ञान विद्यापीठमधल्या घरीच वास्तव्याला होत्या. वयाची नव्वदी पूर्ण केलेल्या निर्मलाताईंचा मायेचा हात आपल्या डोक्यावर आहे हा भाव धनश्रीदीदींप्रमाणे प्रत्येक स्वाध्यायींच्या मनात होता म्हणूनच त्यांच्या अंतिम दर्शनासाठी लाखोंनी ठाण्याचे तत्त्वज्ञान विद्यापीठ गाठले होते. निर्मलाताईंच्या रुपाने स्वाध्यायींसाठी असलेले एक ध्यासपर्व अनंतात विलीन झाले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या